मुंबई हे असे शहर आहे- ज्याला भूतकाळ फार वेळ पचत नाही. जगात अशी मोजकीच शहरे आहेत, ज्यांना वर्तमानकाळात जगण्याचे धाडस आहे. त्यापकी मुंबई हे एक आहे. भारतातील अशा प्रकारच्या मानसिकतेचे हे एकच शहर असावे.

मी इथे वीस वर्षांपूर्वी राहायला आलो. पुण्यातील माझे घर सोडून इथे राहायला येण्याचे नक्की एक असे कारण मला आठवत नाही. मला घरातून बाहेर पडून स्वतंत्र राहायचे होते. आणि भारतात तुम्ही शहर सोडल्याशिवाय घर सोडू शकत नाही. इथे सर्व जण मिळून आनंदी व्हायची किंवा सर्व जणांनी एकत्र मिळून दु:खी व्हायची पद्धत असल्याने मला अशा शहरात जाणे आवश्यक वाटले, जिथे ‘आम्ही सगळे’ यापेक्षा ‘मी’ला जगू दिले जाईल. आपण आपल्याच शहरात वेगळे राहायला लागलो तर आपले आई-वडील आपल्याला पुरेसे स्वतंत्र होऊ देत नाहीत. विशेषत: भारतीय स्त्रिया त्यांच्या मुलांना पटकन् मोकळे करत नाहीत. धार्मिक गोंधळ, सणवार, जुनी कर्तव्ये, रीतिरिवाज असल्या गुंतवळीत भारतीय बायका आपल्या मुलांना अडकवून शक्यतो आपल्यापाशीच ठेवतात. त्याचे एक कौटुंबिक राजकारण असते, जे भारतीय बायकांना शिकवावे लागत नाही.

Return of unseasonal rains in the state
‘अवकाळी’चे पुनरागमन, राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा बरसणार…
sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
bogus police
‘त्या’ बोगस पोलिसाला बॅच कोणती ते सांगता आले नाही 
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

माझ्या आईने उलटे केले. तिने मला फार लहानपणीच स्वयंपाक शिकवला आणि मी ज्या क्षणी ‘घरातून जातो’ असे म्हणालो त्या क्षणी तिने माझी प्रवासाची सोय केली. आपला स्वयंपाक आपल्याला आला की निम्मे प्रश्न सुटतात. ‘मला आता तुझ्या तब्येतीची काळजी नसेल. तू जा,’ असे ती म्हणाली.

मला चित्रपट क्षेत्रात काम करायचे होते. लहानपणीपासून मुंबईत येणे-जाणे असल्याने मला हे शहर ओळखीचे होते. त्यामुळे घरातून बाहेर पडून एकटे राहून पाहायच्या नादात मी आपसूक इथे येऊन राहायला लागलो असणार.

पण मला आज वाटते, की एवढेच एक कारण पुरेसे नव्हते. मी काही दिवसांपूर्वी शाळेपासून मला ओळखणाऱ्या माझ्या एका मित्राला विचारले की, मी माझे जन्मशहर का सोडले असेल? मला नक्की एक असे कारण आठवत नाही. मी इथे मुंबईत का आलो, हे मी विसरून गेलो आहे. माझा हा मित्र फार हुशार आणि संवेदनशील चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याला समोर चालणाऱ्या आणि झालेल्या गोष्टींची दृश्यस्वरूपातील आठवण फार दीर्घ काळ येत असते. भूतकाळ हा त्याचा मित्र आहे. माझा नाही. त्याने मला फार पूर्वीपासून पाहिले आहे आणि त्यामुळे कधी कधी जुने, भूतकाळातले काही मी त्याला विचारत राहतो. आठवणीला फोडणी न देता ती जशीच्या तशी सांगायची जाणीव त्याला आहे.

तो मला म्हणाला की, मला मुंबईची लहानपणापासून ओढ होती. माझ्या बोलण्यात, माझ्या स्वप्नांत नेहमी मी या शहराचा उल्लेख करायचो. मुंबईत माझे मोठे काका राहायचे; त्यांच्याकडे मी सारखा जायचो. आणि कधीही मुंबईहून परत आलो की सारखं मुंबईविषयीच बोलत राहायचो. तू इतर कुठे जाणार होतास? तुला एक ना एक दिवस या शहरातच यायचे होते. तुला मोठय़ा आणि झकपक वातावरणाची फार गोडी आहे.

मी आता लांबच्या उपनगरात राहतो. चाळीस वर्षांचा झालो आहे. लहानपणीपासून मला ज्या मुंबईची ओढ आणि जिचे आकर्षण होते, ती गेटवे ऑफ इंडिया आणि मरिन लाइन्स या भागातील ब्रिटिशांनी वसवलेली जुनी मुंबई माझ्या घरापासून कित्येक किलोमीटर लांब आहे. तिथे पोहोचायला सकाळच्या वाहतुकीच्या गर्दीच्या वेळी मला दीड-दोन तास सहज लागतात. शहर आणि उपनगर या दोन्हींच्या मानसिकता वेगळ्या असल्या तरी मुंबईच्या बाबतीत या शहराचे जे व्यक्तिमत्त्व आहे, ते शहर आणि उपनगराला एकत्र घेऊन घडलेले आहे. मुंबईत तुम्ही कसे कपडे घालता, कोणत्या गाडीतून उतरता, तुमची कोणत्या मोठय़ा माणसाशी ओळखपाळख आहे का, हे तुम्हाला कुणीही विचारत नाही. तुम्ही तुमच्या कामात उत्तम असाल तर हे शहर तुम्हाला फार पटकन् आपलेसे करते. हे काम करणाऱ्या माणसांचे शहर आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या कामात कमी पडू लागता, तुमची जाणीव काळाच्या मागे पडू लागते, त्या क्षणी हे शहर तुम्हाला विसरू लागते. परंतु बाहेर फेकून देत नाही. तितके हे शहर क्रूर नाही. पण हे शहर तुम्हाला विसरून कोपऱ्यात सारून ठेवते. ज्यांना या शहराचा हा अलिखित नियम मान्य आहे ते या शहरात आनंदाने जगू शकतात. या शहराचा हा फक्त एकच नियम आहे. बाकी हे शहर इथे राहणाऱ्या प्रत्येकाला जगण्यासाठी साधन मिळवून देणारे शहर आहे.

भारतातील सध्याचे तरुण मुलांचे संगीत या शहरातच जन्म घेते. भारतातील दृश्यकलेचे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१० सालानंतर ज्या भारतीय सिनेमाने छोटा आकार धारण करून नव्या काळातील आकर्षक कथा मांडायला सुरुवात केली आहे, तो भारतीय सिनेमा या शहरात लिहिला आणि बनवला जातो. ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि भारतातील मोठे बंदर आहे, ही या शहराची जुनी ओळख अजूनही टिकून आहे. परंतु मी मात्र माझी जुनी ओळख आता विसरू लागलो आहे.

मी शहरी माणूस आहे. मला शहरे मनापासून आवडतात. मी आवाज, गर्दी आणि प्रदूषण यांविषयी कधीही तक्रार केलेली नाही. कारण ते आम्ही मिळून तयार केले आहे. शांतपणा आणि संथपणा माझ्या जन्मशहरात बिनपाण्यानेसुद्धा पिकतो. तोच हवा असेल तर इथे कशाला राहा? मला त्या दोन्ही गोष्टींचे काडीमात्र आकर्षण नाही.

मला ‘मी इथे का आलो?’ हा प्रश्न गेली काही वर्षे इथे स्थिर होण्याच्या धामधूमीत कधी पडला नव्हता. तो प्रश्न आता वारंवार पडू लागला आहे. स्थिरस्थावर होताच पडू लागला आहे. आत्ता तर कुठे इथे जगण्याला आकार आणि निवांतपणा आला आहे. आणि आताच हा प्रश्न पडावा याचे मला आश्चर्य वाटते. मनाच्या या अस्थिरपणाचा आणि नको तितका विचार करण्याचा मला कंटाळा येतो.

मला इथे आठवडेच्या आठवडे समुद्र दिसतच नाही. त्याचा आवाज कानात, आठवणीत ठेवावा लागतो. माझ्या घरापासून तो अध्र्या-पाऊण तासाच्या अंतरावर असला तरी त्याच्यापाशी महिनेच्या महिने जाणे होत नाही. महिन्यातून एकदा किंवा दोनदा विमानातून दिवसा खाली उतरताना हे लक्षात येते की तो आपल्या किती जवळ आहे. आपण एका बेटावर राहतो. पण कितीतरी दिवस आपण समुद्र पाहायला जातच नाही.

मी बॉम्बस्फोटांनंतरच्या मुंबईतला रहिवासी आहे. जे १९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या आधीपासून मुंबईत राहिले आहेत, त्यांना मुंबईचे बदललेले स्वरूप अजूनही सहन होत नाही. शहरातील माणसांचा एकमेकांवरील विश्वास कमी झाला आहे. तसेच माणसाचे एकमेकांच्या जातीवरील लक्ष वाढले आहे. मी ज्या मुंबईत राहतो ती सर्व स्थलांतरित माणसांची मुंबई आहे. मूळ रहिवाशांची मुंबई दक्षिणेकडे आहे. ती मुंबई लंडनच्या मध्यभागाप्रमाणे जुनी, श्रीमंत आणि न बदलणारी आहे. पण तिथे राहणे आपल्या मनाला हितावह नसते, कारण तिथे काळ थांबून राहिला आहे. शहराच्या जुन्या मध्यभागापासून लांब असलेल्या स्थलांतरितांच्या उपनगरांमध्ये वर्तमानकाळ असतो. मी जुन्या ब्रिटिश मुंबईत राहत नाही याचे आता मला वाईट वाटत नाही. पूर्वी वाटायचे.

माझा मित्र ओंकार कुळकर्णी- जो मुंबईत जन्मलेला कवी आहे- त्याला मी सांगतो की, तुझ्या लिखाणात अंगण नाही आणि माझ्या लिखाणात अंगण आहे, हा आपल्या दोघांच्या लिखाणातील फरक आहे. तू बाहेर पडलास की थेट गजबजलेल्या रस्त्यावर उतरतोस. आणि मी घर, अंगण, गल्ली, छोटा रस्ता आणि मग वाहतुकीचा हमरस्ता असे लिहितो. आपल्या दोघांना बदलता येणार नाही. जे आहोत ते मान्य करावे लागेल.

खोटे वागून किंवा स्वतविषयी खोटे वाटून चालणार नाही.

एकदा घर सोडले की मग आपण एका ठिकाणी पुन्हा सतत राहू शकत नाही. वणवणीची मनाला गोडी लागते. मी जन्मशहर सोडले तो दिवस एखाद्या आवडत्या सिनेमाइतका मला सर्व पाठ आहे. अजूनही मला तो डोळ्यासमोर दिसतो. पण मी मुंबई सोडीन तो दिवस मला अजूनही कल्पनेत आणता येत नाही. मला जगातील इतर सर्व शहरे कायमची सोडून गेलेली माणसे माहिती आहेत. पण मुंबई कायमची सोडून गेलेले कुणी माहिती नाही. बहुदा तसे करता येत नसावे.

– सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com