पदवीधर मतदारसंघ निवडणूक

कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात बंडखोरीमुळे आघाडीच्या उमेदवारांचा पराभव होतो ही बाब लक्षात आल्याने आता आघाडी तील नेत्यांनी अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले. तर या भेटीमुळे मुश्रीफ यांचे समर्थक, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांची उमेदवारी गोत्यात आली आहे.

महाविकास पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजपला सातत्याने यश मिळत आहे. या यशाला विरोधकांच्या मतविभागणीचा लाभ होत होता हेही स्पष्ट झाले आहे. यावेळी असे होऊ नये याकरिता महाविकास आघाडी सक्रिय होत आहे. आघाडीचे उमेदवार अरुण लाड आज कागलमध्ये आल्यावर मंत्री मुश्रीफ यांनी, या निवडणुकीत लाड यांच्या विजयाने महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला जाईल. त्यात कोल्हापूरचा सिंहाचा वाटा असेल,असा उल्लेख केला.

दुसरीकडे त्यांचे निष्ठावंत समर्थक प्रताप माने यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.आता मुश्रीफ हेच लाड यांचे प्रचारक बनल्याने आपोआपच माने यांची उमेदवारी बाजूला पडण्याची चिन्हे आहेत. या वेळी मुश्रीफ यांनी माने यांचा उत्कृष्ट  संघटक असा उल्लेख करतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सल्लय़ानुसार ते माघार घेतील असे स्पष्ट केले.  के. वाय. पाटील, प्रताप माने यांची नावे राज्यपातळीवर दिसतील असे संकेतही त्यांनी दिले.