कोल्हापूर : हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांनी विधानसभा, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्षपद याचा शब्द देऊन फसवले. माझे राजकारण संपवण्याचे काम त्यांनी केले, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी नेतृत्वावर शुक्रवारी हल्लाबोल चढवला. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर राधानगरी – भुदरगड विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सोळांकुर येथे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी बिद्री कारखान्यातील पराभवाची सल बोलून दाखवली. ते म्हणाले, बिद्रीमध्ये माझ्या पाठीशी न राहता ज्यांनी आत्तापर्यंत स्वार्थाचा विचार केला अशांना जिल्ह्यात पदे देऊन मोठे केले. पण हेच लोक माझ्या पडत्या काळात सोडून गेले याचे दुःख आहे.
हेही वाचा – कोल्हापूर: खासदारांचा संपर्क नाही; ही विरोधकांची स्टंटबाजी, धैर्यशील माने
मेहुण्यांना डिवचले
सत्तेचा गैरवापर करत बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील कार्यकर्त्यांना आमिष दाखवत आहेत. वेगवेगळी खोटी आश्वासने देऊन अनेकांना ते झुलवत आहेत. बिद्रीच्या निवडणुकीत ९० दिवसात नोकर भरती करण्याचे आश्वासन दिले होते. ६० दिवस झाले काहीच हालचाल झालेली नाही. नोकर भरतीचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली पण सभासदांचा विश्वासघात केला, अशी टिका त्यांनी त्यांचे मेहुणे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर केली.