कोल्हापूर : भाजपपाठोपाठ महायुतीतील अन्य दोन मित्र पक्षांनीही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेने आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार चंद्रदीप नरके यांना संधी दिली आहे. तर राजेश क्षीरसागर अजूनही प्रतीक्षेत आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांना पुन्हा रिंगणात उतरवलेले आहे. उमेदवारी पाठोपाठ बंडखोरीचा आवाज घुमू लागला आहे. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीमधील संघर्षात उमेदवारी जाहीर करण्यात महायुतीने आघाडीच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. युतीतील भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांनी एकूण १० पैकी ६ उमेदवार जाहीर केले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात काही जणांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळालेली आहे तर काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कागलमधून हसन मुश्रीफ तर शेजारच्या चंदगडमधून राजेश पाटील या दोन विद्यमान आमदारांना पुन्हा आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. राजेश पाटील यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी गतवेळचे बंडखोर शिवाजी पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने आता ते पुन्हा बंडखोरी करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>कोल्हापुरात आघाडी, महायुतीत बंडाचे झेंडे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधानगरीत प्रकाश आबिटकर या आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. येथे जनसुराज्य शक्ती पक्षाने संताजी घोरपडे यांची उमेदवारी आधीच घोषित केली आहे. त्यामुळे घोरपडे येथे बंडाचा झेंडा हाती घेणार का? हे लक्षवेधी ठरले आहे.

के. पी. पाटील यांच्या हाती शिवबंधन; राधानगरीतून उमेदवारी जाहीर

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी बुधवारी मशाल हाती घेतली. मुंबईत मातोश्री भवनात पक्ष नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करतानाच उमेदवारीही मिळवली. यामुळे या मतदारसंघात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असा थेट सामना होणार हे स्पष्ट झाले आहे.

राधानगरी भुदरगड मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची स्पर्धा रंगली होती. यामध्ये पाटील यांनी पक्षांतर करीत बाजी मारली. शिवसेना प्रवेशावेळी संजय राऊत, विनायक राऊत, आजरा तालुका शिवसेनेचे संभाजी पाटील, राधानगरी शिवसेनेचे सुरेश चौगुले, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगुले, बिद्रीचे संचालक राजू भाटळे, रणजित मुडूकशिवाले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा >>>शक्तिपीठ महामार्ग रद्द; हसन मुश्रीफ यांची घोषणा

दोन महिन्यात तिसरा पक्ष

मूळचे काँग्रेसचे असलेले के. पी. पाटील हे नंतर अपक्ष म्हणून निवडून आले होते. पुढे ते राष्ट्रवादीकडून आमदार झाले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले होते. आता त्यांनी विधानसभेवर डोळा ठेवत हाती मशाल घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहुण्यांचे ठरले मेहुण्यांचे काय?

या मतदारसंघात के. पी. पाटील यांच्या बरोबरीनेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील या मेहुण्या – पाहुण्यांमध्ये उमेदवारीची चुरस रंगली होती. आता केपी यांना उमेदवारी मिळाल्याने ए. वाय. बंड करणार का याकडे नजरा लागल्या आहेत.