कोल्हापूर – मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या कुर्मगतीने काल कहर केला. तब्बल सात तास उशिरा ही रेल्वे मुंबईला पोहोचली. यामुळे प्रवाशांच्या संयमाचा कडेलोट झाला. त्यांनी रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.

कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, कराड, सातारा भागातील रेल्वे प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी प्रामुख्याने महालक्ष्मी एक्सप्रेसवर अवलंबून राहावे लागते. काल ( २८ फेब्रुवारी) रात्री ८. ५० वाजता कोल्हापूरहून निघालेली ही रेल्वे संथगतीने धावत राहिली.

मिरज येथे तांत्रिक काम सुरू असल्याचे कारण प्रवाशांना देण्यात आले. त्यामध्ये खूपच वेळ गेला. त्यानंतरही रेल्वेची कासव गती काही दूर झाली नाही. सकाळी सात वाजता रेल्वे मुंबईत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र त्यासाठी साडेसात तास उशीर झाला. रेल्वे प्रशासनाच्या या नियोजनावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रवाशांना त्रास

रेल्वे उशिरा पोहोचल्यामुळे अनेक प्रवाशांचे औषध, नाश्ता, जेवण चुकत राहिले. नोकरदारांना रजा घेणे भाग पडले. कामासाठी गेलेल्या लोकांचा खोळंबा झाला. एकूणच प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशांना विदेशी प्रवास करावा लागणार होता. त्यांचे विमान चुकल्यानेही त्यांनी व नातेवाईकांनी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

प्रशासन, लोक्प्रतीनिधीवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या साऱ्या अडचणींची थोडी जरी जाणीव रेल्वे प्रशासनाचा आहे का? असा खडा सवाल करण्यात आला. रेल्वे सुरू होण्यासाठी थोडेफार प्रयत्न केले की सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेतात. पण प्रवाशांना असा सातत्याने त्रास भोगावा लागत असताना ते कोठे तोंड लपवून बसले आहेत, अशी विचारणा प्रवाशांनी केली आहे.