कोल्हापूर : पूरग्रस्तांचे प्रश्न आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सोमवारी राजू शेट्टी यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन केले आहे, असे मुख्यमंत्र्यांचे पत्र रविवारी नृसिंहवाडी येथे राजू शेट्टी यांना देण्यात आले. पूरग्रस्तांना पुरेशी मदत मिळाली नाही, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंचगंगा परिक्रमा आंदोलन सुरू केले आहे. रविवारी त्याची सांगता नृसिंहवाडी येथे  जलसमाधी घेऊन करणार असल्याचे शेट्टी यांनी घोषित केले होते.

शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. नृसिंहवाडी येथे सभा सुरू होण्यापूर्वी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे पत्र सादर केले. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी शेट्टी यांच्यासमवेत उद्या दुपारी तीन वाजता ‘वर्षां’या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले असल्याचे नमूद केले आहे. या बैठकीत पूरग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र पूरग्रस्तांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी या सभेत दिला.

शासनावर टीकास्त्र

सभेत शेट्टी यांनी कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका उद्भवणार असल्याने राज्य शासनाने याबाबत वेळीच योग्य भूमिका घेण्याची मागणी केली. पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याचा शब्द  देऊनही अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. नवे पूल बांधताना धरणसदृश भिंती बांधल्याने पुराचा धोका वाढला आहे. याबाबत शासनाची भूमिका निष्क्रिय आहे. अशा अनेक मुद्दय़ांवर शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनावर टीकास्त्र सोडले.

कार्यकर्त्यांच्या नदीपात्रात उडय़ा

पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पंचगंगा परिक्रमा यात्रेवेळी दोन कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीपात्रात उडय़ा मारल्या. या वेळी बचाव पथकाने त्यांना पात्राबाहेर काढले.