रोहित शर्माकडे भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले पाहिजे, असे गौतम गंभीर, मायकेल वॉन आणि वीरेंद्र सेहवाग या माजी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे.

‘‘रोहित शर्माकडे ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवले नाही तर भारताच्या संघाचेच मोठे नुकसान आहे. अर्थातच त्यात रोहितचे नुकसान नाही. कर्णधार हा त्याच्या संघाप्रमाणेच सर्वोत्तम असायला हवा. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी पाच विजेतेपदे पटकावली आहेत,’’ असे गंभीरने म्हटले. गंभीरने त्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वगुणाचेही कौतुक केले. ‘‘धोनी हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे, असे नेहमी म्हटले जाते. धोनीने भारताला दोन विश्वचषक आणि तीन आयपीएल विजेतेपदे कर्णधार म्हणून जिंकून दिली आहेत. साहजिकच धोनीच्या नेतृत्वगुणाचे कौतुक होणारच. रोहित हा आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार आहे. जर भारताचा ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार रोहितला केले नाही तर ते लाजिरवाणे ठरेल,’’ असे गंभीर म्हणाला.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही रोहितकडे ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्याची मागणी केली आहे. ‘‘भारताचा ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार रोहितच असायला हवा, यात शंका नाही. रोहितला ट्वेन्टी-२० लढती कशा जिंकायच्या, हे चांगले ठाऊक आहे. विराट कोहलीला नेतृत्वाच्या जबाबदारीतून थोडे मुक्त केले तर त्यालादेखील मनमोकळेपणाने फलंदाजी करता येईल. बऱ्याच संघांचे कसोटीचे कर्णधार आणि ट्वेन्टी-२० कर्णधार वेगवेगळे आहेत,’’ असे वॉन म्हणाला.

रोहित हा ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार आहे, असे कौतुकोद्गार भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने काढले. ‘‘रोहितच्या फटकेबाजीची आता सर्वाना सवय झाली आहे. मुंबई इंडियन्स हा जगातील ट्वेन्टी-२०मधील सर्वोत्तम संघ आहे. आयोजकांनीदेखील करोना साथीच्या काळात स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले,’‘ असे सेहवागने म्हटले.