दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ आज आपला अखेरचा टी-२० सामना खेळणार आहे. पहिला सामना भारताने आणि दुसरा सामना आफ्रिकेने जिंकल्यानंतर तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. हा दौरा संपतो न संपतो तोच मार्च महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी रवाना होईल. श्रीलंकेला स्वातंत्र मिळून ७० वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्ताने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने तिरंगी टी-२० मालिकेचं आयोजन केलं आहे. या मालिकेत यजमान श्रीलंकेसह भारत आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे. ६ ते १८ मार्चदरम्यान ही मालिका खेळवली जाणार आहे.

मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यासाठी एम. एस. के. प्रसाद यांची निवड समिती संघातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. यामध्ये कर्णधार विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यासारख्या खेळाडूंचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शनिवार किंवा रविवारी तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांनी २०१७-१८ वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्येही या तिघांची कामगिरी आश्वासक झालेली आहे. त्यामुळे आगामी आयपीएलचा हंगाम लक्षात घेता विराटसह काही महत्वाच्या खेळाडूंना निवड समिती श्रीलंका दौऱ्यात विश्रांती देऊ शकते. भुवनेश्वर आणि जसप्रीतच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांच्यावर भारताच्या गोलंदाजीची धुरा सोपवली जाऊ शकते.