कोइम्बतूर : कसोटी कारकीर्द पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या मुंबईच्या फलंदाजांचे आज, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बुची बाबू करंडक स्पर्धेतील तमिळनाडू एकादशविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरीचे लक्ष्य असेल. या दोघांसह कर्णधार सर्फराज खानच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल.

भारतीय संघ पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी बुची बाबू स्पर्धा आणि दुलीप करंडकात लक्षवेधी कामगिरी करण्याचा मुंबईच्या त्रिकुटाचा मानस असेल. तमिळनाडूच्या संघात कर्णधार साई किशोर, बाब इंद्रजीत आणि प्रदोष पॉल यांसारख्या त्यांच्या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असल्याने हा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> माजी फुटबॉल प्रशिक्षक एरिक्सन यांचे निधन

सूर्यकुमारची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. मात्र, कसोटी आणि एकदिवसीय संघापासून तो दूर आहे. त्याने आपला एकमेव कसोटी सामना फेब्रुवारी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. परंतु आता आपण क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे. कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांना तो बुची बाबू स्पर्धेपासून सुरुवात करणार आहे.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरही गेल्या काही काळापासून कसोटी संघातून बाहेर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या श्रेयसला कसोटीत मात्र फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्याने १४ सामन्यांच्या २४ डावांत ८११ धावा केल्या आहेत. यात केवळ एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध तो अजूनही अडचणीत सापडतो. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील मालिकांसाठी त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसते. असे असले तरी निवड समितीला आपला विचार करण्यास भाग पाडण्यासाठी तो उत्सुक असेल.

मुंबई संघाचे नेतृत्व सर्फराजकडे आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे सर्फराजला या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. त्याने तीन कसोटीच्या पाच डावांत तीन अर्धशतकांच्या मदतीने २०० धावा केल्या. मात्र, त्या मालिकेत विराट कोहली आणि ऋषभ पंत यांसारखे आघाडीचे फलंदाज खेळले नव्हते. त्यामुळे या दोघांच्या पुनरागमनानंतर सर्फराजचे कसोटी संघातील स्थान कायम राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● वेळ : सकाळी ९.३० वा. ● थेट प्रक्षेपण : तमिळनाडू क्रिकेट संघटना यूट्यूब