भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाची दमछाक झाली आणि पहिल्या डावात केवळ ७८ धावांवरच त्यांचा डाव संपुष्टात आला. यानंतर आज दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने शतकवीर जो रूट आणि बर्न्स-हमीद यांच्या अर्धशतकी योगदानामुळे भारतासमोर १२९ षटकात ८ बाद ४२३ धावा उभारल्या आहेत. इंग्लंडकडे आता ३४५ धावांची आघाडी आहे.

पहिल्या दिवशी रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर बिनबाद १२० धावांवरून पुढे खेळण्यास आज इंग्लंडने सुरुवात केली.  वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारताला पहिले यश मिळवून दिले. इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ६१ धावा काढून बाद झाला. डावाच्या ५०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शमीने त्याला बोल्ड केले. बर्न्सने १५३ चेंडूंचा सामना केला आणि आपल्या खेळीत ६ चौकार आणि एक  षटकार ठोकला. त्यानंतर हसीब हमीदची साथ देण्यासाठी डेव्हिड मलान फलंदाजीला आला. तो मैदानावर रुळेपर्यंत फिरकीपटू रवींद्र जडेजाने हमीदला बोल्ड केले. हमीदने १२ चौकारांसह ६८ धावा केल्या. लंचनंतर कर्णधार जो रूट आणि मलान यांनी भारतीय गोलंदाजांंना हैराण केले.  या दोघांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडची आघाडी दोनशेपार पोहोचवली. मोहम्मद सिराजने मलानचा अडथळा दूर केला. त्याने मलानला पंतकरवी झेलबाद केले. मलानने ११ चौकारांसह ७० धावांची खेळी केली.

चहापानानंतर जो रूटने सलग तिसऱ्या कसोटीत शतक पूर्ण केले.  १०४व्या षटकात त्याने इशांतला चौकार खेचत बॅट हवेत उंचावली. शतकी खेळी केल्यानंतर जसप्रीत बुमराहने रूटची दांडी गुल केली. रूट बाद झाल्यानंतर इंग्लंडने मोईन अली आणि सॅम करनलाही स्वस्तात गमावले. जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर यांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा क्रेग ओव्हर्टन (२४) आणि ओली रॉबिन्सन (०) नाबाद होते. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर सिराज आणि जडेजाला दोन बळी घेता आले.

भारताचा पहिला डाव

लोकेश राहुल  आणि रोहित शर्मा यांंनी भारताच्या डावाची सुरुवात केली. लॉ़र्ड्स कसोटीत सामनावीर ठरलेला लोकेश राहुल या डावात शून्यावर माघारी परतला, तर त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजाराही एका धावेवर बाद झाला. या दोघांना इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने यष्टीरक्षक जोस बटलकरवी झेलबाद केले. त्यानंतर अँडरसनने भारताला अजून एक तडाखा दिला. त्याने कर्णधार विराट कोहलीला अवघ्या ७ धावांवर तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिक्य रहाणे यांच्याकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. पण संघाचे अर्धशतक फलकावर लावल्यानंतर ओली रॉबिन्सनने रहाणेला (१८)  बाद केले. लंचपर्यंत भारताची २५.५ षटकात ४ बाद ५६ धावा  अशी अवस्था झाली.

हेही वाचा – ENG vs IND : विराटमुळं वातावरण तापलं, LIVE कॉमेंट्री दरम्यान गावसकर-हुसेन यांच्यात झाला वाद

लंचनंतरही इंग्लंडने आपला तिखट मारा सुरूच ठेवला. ओली रॉबिन्सनने ऋषभ पंतला वैयक्तिक २ धावांवर बाद केले. त्यानंतर सामन्यात संधी मिळालेल्या क्रेग ओव्हर्टनने सलामीवीर रोहित शर्मा (१९) आणि मोहम्मद शमीला (०) बाद करत भारताला अजून संकटात टाकले.  क्रेग ओव्हर्टननेच ४१व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला रूटकरवी झेलबाद करत भारताचा डाव ७८ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडकडून अँडरसन आणि ओव्हर्टन यांना प्रत्येकी तीन, तर रॉबिन्सन आणि करनला प्रत्येकी दोन बळी घेता आले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा,  जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, के. एल. राहुल.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, हसीब हमीद, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन.