India vs West Indies 4th T20: तिसऱ्या टी२० मध्ये वेस्ट इंडिजचा ७ गडी राखून पराभव केल्यानंतर, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया शनिवारी फ्लोरिडामध्ये चौथ्या टी२० मध्ये उतरताना आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतील चौथा आणि पाचवा टी२० सामना अनुक्रमे १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जाईल.

पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता चौथा आणि पाचवा टी२० मालिकेत १-२ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी करा किंवा मरो असा असेल. वेस्ट इंडिजने पहिला टी२० सामना ४ धावांनी आणि दुसरा टी२० सामना २ गडी राखून जिंकला. पण टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत तिसऱ्या टी२०मध्ये वेस्ट इंडिज संघाचा ७ गडी राखून पराभव करत मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

पहिल्या दोन टी२०मध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाजीने तिसऱ्या टी२०मध्ये दमदार कामगिरी करत १७.५ षटकांत १६० धावांचे लक्ष्य गाठले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप झाल्यानंतर, तिसऱ्या टी२० मध्ये, सूर्यकुमार यादवने आपल्या परिचित शैलीत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूत ८३ धावा फटकावल्या. सूर्याशिवाय याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने सलग तिसऱ्या सामन्यात नाबाद ४९ धावांची खेळी केली. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात १३९ धावा करत तिलक या मालिकेत सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर आहेत. यादरम्यान त्याने अर्धशतकही झळकावले आहे.

टीम इंडियाच्या सलामीवीरांना पुन्हा आपली ताकद दाखवावी लागणार आहे

काही वगळता टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज या टी२० मालिकेत आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत. विशेषत: भारताची सलामीची जोडी पहिल्या तीन टी२० सामन्यांमध्ये अपयशी ठरली आहे. पहिल्या दोन सामन्यात इशान किशन आणि शुबमन गिल ही जोडी केवळ ५ आणि १६ धावाच करू शकली, तर तिसर्‍या सामन्यातून भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीलाही केवळ ६ धावाच करता आल्या. या टी२० मालिकेत सलामीची जोडी अपयशी ठरल्याने टीम इंडियाच्या कामगिरीवर परिणाम झाला असून ते मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहेत.

टी२० मालिकेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दाखवली ताकद

भारताविरुद्धच्या या टी२० मालिकेत आतापर्यंत विंडीजच्या फलंदाजांनी आपली ताकद दाखवली आहे. पहिल्या दोन सामन्यात ४ आणि ६७ धावा करणाऱ्या निकोलस पूरनकडून विंडीज संघाला आणखी एका दमदार खेळीची अपेक्षा असेल. तिसऱ्या सामन्यात पूरनला केवळ २० धावा करता आल्या आणि विंडीज संघाने ७ विकेट्सने सामना गमावला. पूरन व्यतिरिक्त, कर्णधार रोव्हमन पॉवेलकडूनही विंडीज संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे, ज्याने पहिल्या टी२० मध्ये ४८ धावा आणि तिसऱ्या टी२० मध्ये ४० धावा केल्या.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी२० यांच्यातील आकडेवारी?

भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये २८ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारताने १८ सामने जिंकले आहेत, ९ गमावले आहेत आणि एक सामना बरोबरीत संपला आहे. उभय संघांमध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर १० टी२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ५ भारताने जिंकले आहेत तर वेस्ट इंडिजने ५ सामने जिंकले आहेत.

फ्लोरिडामध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा काय आहे रेकॉर्ड?

भारताने फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत ६ टी२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने ४ जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने १ सामना जिंकला आहे आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. विशेष म्हणजे टीम इंडियाने आपले शेवटचे चार टी२० सामने येथे जिंकले आहेत.

हेही वाचा: Asian Games: “माझे नाव नव्हते तेव्हा…”, आशियाई क्रीडा स्पर्धेत निवड न झाल्याबद्दल शिखर धवनने सोडले मौन

वेस्ट इंडिजने २०१६ पासून फ्लोरिडामध्ये जिंकलेले नाही

विंडीज संघाने फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या १० टी२० सामन्यांपैकी ६ गमावले आहेत, तर फक्त ३ सामने जिंकले आहेत, एक सामना पावसामुळे रद्द झाला. ऑगस्ट २०१६ मध्ये भारताला एका धावाने पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिजने फ्लोरिडामध्ये त्यांचे शेवटचे सहा टी२० सामने गमावले आहेत.

चौथ्या टी२० ची तारीख: १२ ऑगस्ट

वेळ: रात्री ८ पासून (भारतीय वेळेनुसार)

स्थळ: सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम, लॉडरहिल (फ्लोरिडा)

थेट प्रवाह: जिओ सिनेमा, फॅनकोड (भारतात)

थेट प्रसारण: डीडी स्पोर्ट्स

हेही वाचा: Babar Azam: ऐकाव ते नवलंच! आता बाबर आझमने असं काय केलं की रमीझ राजाला त्याच्याशी लग्न करावेसे वाटत आहे? पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिया प्लेइंग इलेव्हन (अपेक्षित): यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन (अपेक्षित): रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काईल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, ओबेड मॅककॉय, शिमरॉन हेटमायर, ब्रँडन किंग, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड.