Indian Primer League Auction 2024: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. लिलावासाठी ३३३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सर्व संघांकडे फक्त ७७ जागा शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंची नावे जोडली जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला कोणीही विकत घेतले नाही.
स्मिथने आयपीएलमध्ये पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. स्मिथची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. तो दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोची टस्कर्स केरळ आणि पुणे वॉरियर्स इंडिया या संघांचा देखील भाग होता. स्मिथने १०३ आयपीएल सामन्यात ३४.५१च्या सरासरीने २४८५ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १२८.०९ आहे. दीड कोटींची मूळ किंमत असलेल्या न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फिलिप सॉल्टला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. कोणत्याही संघाने ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक जोश इंग्लिशला दोन कोटी रुपयांच्या मूळ किंमतीला विकत घेतलं नाही. कुसल मेंडिसवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही, ज्याची मूळ किंमत ५० लाख आहे आणि तो देखील या लिलावात विकला गेला नाही. जोश हेझलवूड आणि लॉकी फर्ग्युसन हे सुद्धा अनसोल्ड राहिले.
मनीष पांडेला १७० आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे
भारताचा अनुभवी फलंदाज मनीष पांडेचा संघात कोणीही समावेश केला नाही. मनीषची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. १७० आयपीएल सामन्यांमध्ये त्याने २९.०७च्या सरासरीने ३८०८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १२०.९७ आहे. पांडे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पुणे वॉरियर्स इंडिया, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचा भाग आहे.
करुण नायरलाही खरेदीदार मिळाला नाही
भारताचा फलंदाज करुण नायरलाही विकता आले नाही. नायरची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. त्याने आयपीएलमध्ये ७६ सामने खेळले आहेत. त्याने २३.७५च्या सरासरीने १४९५ धावा केल्या आहेत. नायर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा भाग आहे.
हेही वाचा: IPL 2024 Auction: आयपीएल लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरले जाईल का? जाणून घ्या सर्व नियम
रिले रुसोही न विकला गेला
दक्षिण आफ्रिकेच्या रिले रुसोलाही कोणी विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. रुसो हा आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. रुसोने १४ सामने खेळले आहेत. या कालावधीत २१.८३च्या सरासरीने २६२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३६.४६ आहे.