Delhi Capitals vs Chennai Super Kings IPL 2024 Highlights : आयपीएलच्या १७ व्या हंगामात सलग दोन सामने पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी झाला. हा सामना डॉ. वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला आहे. या सामन्यात २० धावांनी विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या विजयाचे खाते उघडले. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या विजयी रथालाही ब्रेक लावला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ५ गडी गमावून १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात सीएसकेला २० षटकांत ६ गडी गमावून १७१ धावा करता आल्या.
IPL 2024 Highlights, DC vs CSK: आज खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २० धावांनी विजय मिळवत आपले विजयाचे खाते उघडले आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन सामन्यातील विजयानंतर तिसऱ्या सामन्यात विजयी रथाला ब्रेक लागला आहे.
महेंद्रसिंग धोनीची १६ चेंडूत नाबाद ३७ धावांची झंझावाती खेळीही चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून देऊ शकली नाही. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना २० धावांनी जिंकला. या मोसमातील चेन्नईचा हा पहिला पराभव असला तरी दिल्लीचा हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ऋषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईला १९२ धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. मात्र, अजिंक्य रहाणे आणि धोनीने संघाला लक्ष्याच्या जवळ नेले, पण विजय मिळवता आला नाही. रहाणेने ३० चेंडूत ४५ धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने सर्वाधिक ३ बळी घेतले.
चेन्नई सुपर किंग्जला आता विजयासाठी १२ चेंडूत ४६ धावा करायच्या आहेत. १८ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६ विकेटवर १४६ धावा आहे. या षटकात धोनीने षटकार ठोकला. माही सहा चेंडूत १६ धावा तर जडेजा १५ चेंडूत १८ धावांवर खेळत आहे.
चेन्नई सुपर किंग्जला आता विजयासाठी १८ चेंडूत ५८ धावा करायच्या आहेत. १७ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६ विकेटवर १३४ धावा आहे. रवींद्र जडेजा १२ चेंडूत १६ धावांवर तर एमएस धोनी तीन चेंडूत ९ धावांवर खेळत आहे.
मुकेश कुमारच्या एकाच षटकात चेन्नईला दोन मोठे धक्के बसले आहेत. मुकेशच्या १४ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर रहाणेला बाद केले. अवघ्या ५ धावांसाठी त्याचे अर्धशतक हुकले. रहाणेने ३० चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारासह ४५ धावा केल्या होत्या. तर पुढच्याच चेंडूवर नुकताच आलेल्या समीर रिझवीला गोल्डन डकवर बाद केले.
११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अक्षरने संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे. रहाणे-मिचेलची भागीदारी तोडत त्याने मिचेलला झेलबाद केले. बाद होण्यापूर्वी २६ चेंडूत २ षटकार आणि एका चौकारासह ३४ धावा केल्या.
पहिल्या दोन विकेट्सनंतर रहाणे-मिचेलच्या जोडीने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनीही १० षटकांनंतर संघाचा डाव ७५वर नेऊन ठेवला. मिचेल ३४ तर रहाणे ३३ धावांवर खेळत आहे.
खलील अहमदने चेन्नईला दुसरा मोठा धक्का दिला आहे. ऋतुराज गायकवाडनंतर सलामीवीर रचिन रवींद्रलाही झेलबाद करवत स्वस्तात माघारी पाठवले. बाद होण्यापूर्वी रचिनने १२ चेंडूत २ धावा केल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्जला पहिल्याच षटकात खलील अहमदने पहिला धक्का दिला आहे. ऋतुराज गायकवाड दोन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. आता अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
प्रथम फलंदाजी करत पंत आणि वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने ५ बाद १९१ धावा केल्या. वॉर्नर आणि पृथ्वी शॉने तुफान फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करत संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. वॉर्नर ५२ तर शॉ ४३ धावा करत बाद झाले. या दोघांच्या विकेटनंतर दिल्ली संघाच्या धावांना ब्रेक लागला पण मार्श आणि पंत मैदानात कायम होते. पाथिरानाने १५व्या षटकात दिल्लीला सलग दोन धक्के दिले, पण कर्णधार पंतने आपली वादळी फलंदाजी करत संघाला १८० धावसंख्येपर्यंत आणून ठेवले.
पंतने एक शानदार खेळी करत बाद होण्यापूर्वी ३२ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. पंतच्या खेळीमुळे दिल्लीचा संघ १९० धावांचा आकडा गाठू शकला.चेन्नईला आता विजयासाठी १९२ धावांचे आव्हान दिल्लीने दिले आहे.
ऋषभ पंतने शानदार कमबॅक करत जबरदस्त फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.पाथिरानाच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार लगावत आपले दणदणीत अर्धशतक झळकावले. पाथिरानाच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने ३२ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या.
सलग दोन धक्क्यांनंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल संघाची धुरा सांभाळत आहेत. पंत संधी मिळताच मोठे फटके मारत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेत आहे. १८ षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या ४ बाद १६२ धावांवर आहे.
दिल्लीचे १५ वे षटक सामन्याचा रोख बदलणारे ठरले. पाथिरानाने एकाच षटकात दोन विकेट्स घेतले. जबरदस्त यॉर्कर टाकत मिचेल मार्शला चौथ्या चेंडूवर आणि सहाव्या चेंडूवर नुकत्याच आलेल्या स्टब्सला क्लीन बोल्ड केले. सध्या दिल्लीची धावसंख्या ४ बाद १३४ धावा आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत अजूनही मैदानावर कायम आहे.
वॉर्नरसोबत शानदार फलंदाजी केल्यानंतर शॉ अर्धशतकाच्या वाटेवर होता. जडेजाच्या पहिल्या षटकात फटकेबाजी केल्यानंतर दुसऱ्या षटकात मात्र जडेजाने आपल्या फिरकीच्या जोरावर त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. शॉने बाद होण्यापूर्वी २७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या.
डेव्हिड वॉर्नरने सुरूवातीपासूनच फटकेबाजी करत ३५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. पृथ्वी शॉसोबत पहिल्या विकेटसाठी त्याने ८७ धावांची भागीदारी केली.पण अर्धशतकासह वार्नर फार काळ मैदानात टिकू शकला नाही, मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर एकदा जीवदान मिळाल्यानंतर अखेरीस तो तिसऱ्या चेंडूवर पाथिरानाकडून झेलबाद झाला. पाथिरानाने कमाल झेल टिपत वॉर्नरला झेलबाद केले.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1774448783297782125
मुस्तफिजूरचे सहावे षटक दिल्लीसाठी खूपच फायदेशीर ठरले. मुस्तफिजूरच्या षटकात वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ने चौकारांचा पाऊस पाडला. शॉने सलग तीन चौकार लगावत हॅटट्रिक लगावली. मुस्तफिजूरच्या या षटकात १८ धावा केल्या. पॉवरप्लेपर्यंत दिल्लीची धावसंख्या बिनबाद ६२ धावा इतकी आहे. पृथ्वी २४ धावांवर तप वॉर्नर ३५ धावा करत खेळत आहेत.
दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरची जोडी सलामीसाठी उतरली आहे. पहिल्याच षटकात अखेरच्या चेंडूवर वॉर्नरने चौकार खेचला. चहरने गोलंदाजीला चेन्नईकडून सुरूवात केली.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिझूर रहमान.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीचा संघ दोन बदलांसह दाखल झाला आहे. कुलदीप यादव आणि रिकी भुईच्या जागी पृथ्वी शॉ आणि इशांत शर्माला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर या सामन्यात चेन्नई कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स आणि ॲनरिक नॉर्किया या चार विदेशी खेळाडूंसह दिल्ली या सामन्यात खेळणार आहे. याशिवाय डॅरिल मिचेल, मथीशा पाथिराना, रचिन रवींद्र आणि मुस्तफिझूर रहमान या चार विदेशी खेळाडूंसह चेन्नई खेळताना दिसणार आहे.
रविवारी होणाऱ्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ या मोसमात प्रथमच विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, सीएसकेविरुद्ध दिल्लीचा रेकॉर्ड चांगला नसल्यामुळे त्याचा मार्ग सोपा होणार नाही. या स्पर्धेत उभय संघांमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी १९ वेळा सीएसकेने विजय मिळवला आहे, तर दिल्लीने १० सामन्यांमध्ये विजयाची चव चाखली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला गेल्या चार सामन्यांमध्ये सीएसकेचे आव्हान पेलता आले नाही. त्यातही त्यांच्या पराभवाचे अंतर ९१ धावा, २७ धावा आणि ७७ धावांचे आहे, जे त्यांची स्थिती दाखवण्यासाठी पुरेसे आहे.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिझूर रहमान.
सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पृथ्वीचा सीएसकेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचे संकेत दिले आहेत. पाँटिंग म्हणाला, 'प्रशिक्षणादरम्यान आम्ही पृथ्वी शॉवर लक्ष ठेवले. जर तो सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला, तर आम्ही त्याला सीएसकेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा विचार करू शकतो.' पृथ्वीने गेल्या मोसमात आपल्या फलंदाजीने खूप निराश केले होते. त्यामुळे त्याला आजपर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.
विशाखापट्टणमच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते. या मैदानावर स्पिनर्सपेक्षा वेगवान गोलंदाज जास्त विकेट घेतात. DC vs CSK खेळपट्टीवर गवत आहे आणि चांगली विकेट असल्याचेही म्हटले जाते. या मैदानावर २०१९ मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळला गेला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शेवटचा आयपीएल सामना १० मे २०१९ ला DC आणि CSK यांच्यातील 'क्वालिफायरचा सामना' होता.
दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चेन्नईने १९ सामने जिंकून आपले वर्चस्व राखले आहे.