KL Rahul Sacrifice for Team India IND vs ENG: भारताचा नव्या कसोटी संघाची सुरूवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा इंग्लंडने पहिल्याच कसोटीत ५ विकेट्सने पराभव केला. ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने ०-१ ने आघाडीवर आहे. तर या सामन्यात भारताने पाच शतकं झळकावली. हेडिंग्ले कसोटीतील प्रमुख कामगिरी करणाऱ्या केएल राहुलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. दरम्यान केएल राहुलच्या कोचने त्याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
राहुल संघाच्या आधी इंग्लंडमध्ये पोहोचून सराव करत होता. या मालिकेपूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्धच्या शेवटच्या अनधिकृत कसोटीत त्याने इंडिया अ संघाकडून शतकही झळकावले होते. आता त्याचा आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी या मालिकेसाठी त्याने दिलेल्या त्यागाबद्दल माहिती दिली आहे.
हेमांग बदानी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केएल राहुलबद्दल वक्तव्य केलं. केएल राहुलला इंग्लंडला लवकर जायचं होतं आणि इंग्लंड लायन्सविरुद्ध शेवटचा अनधिकृत कसोटी सामना खेळायचा होता जेणेकरून त्याला थोडा सराव करता येईल हे मला खूप आवडलं. त्याने असंही सांगितलं की त्याची लेक इवारा लहान असल्याने यंदा इंग्लंड दौऱ्यासाठी त्याच्याबरोबर जाणार नाहीये. त्यामुळे राहुलचा हा एक मोठा निर्णय होता.
हेमांग बदानी म्हणाले, “मला त्याच्याबाबतीत एक गोष्ट आवडली. तो म्हणाला, मला सराव सामना खेळायचा आहे. त्याचं शतक विसरा, ते शतक त्याने नंतर केलं. पण देशाप्रती त्याची असलेली निष्ठा, ती महत्त्वाची आहे. इंग्लंडला लवकर जाऊन तिथे सराव करत दौऱ्यासाठी त्याला तयारी करायची होती. बरं तो नुकताच बाबा झाला आहे, हे विसरून चालणार नाही आणि त्याची मुलगीही त्याच्याबरोबर तिथे नसणारे. त्यावर राहुल म्हणाला, माझ्या मुलीआधी देश महत्त्वाचा आहे. हा खूप मोठा निर्णय आहे.”
“तो सहज म्हणू शकला असता की, मी सराव सामना खेळणार नाहीये, मी थेट कसोटी सामना खेळेन, पण त्याने तसं केलं नाही”, असं बदानी पुढे म्हणाले.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी राहुलचं वक्तव्य काय होतं हे, कोच बदानी यांनी सांगितलं. “राहुलने इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मला सांगितलं होतं. मला या संघाची काळजी आहे आणि मला इंग्लंडला लवकर जायचं आहे. त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या बोलण्यात मला संघासाठी योगदान देण्याची भूक दिसत होती. रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत तो सर्वात वरिष्ठ फलंदाज ठरतो आणि त्याने ही भूमिका खरोखरच उत्तम प्रकारे बजावली आहे.”, असं बदानी यांनी सांगितलं.
केएल राहुलने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात उत्कृष्ट कामगिरी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. राहुल पहिल्या डावात ४२ धावा करत बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावत भारताचा डाव सावरला.