क्वालालंपूर : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय या भारतीय खेळाडूंनी गुरुवारी मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला व पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूने थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवॉनला १९-२१, २१-९, २१-१४ असे ५७ मिनिटे चाललेल्या लढतीत नमवले. या सामन्याचा पहिला गेम सिंधूने दोन गुणांनी गमावला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये तिने दिमाखदार खेळ सुरू ठेवत विजय साकारला. पुढच्या फेरीत सिंधूचा चायनीज तैपेईच्या ताय झू यिंगशी सामना होणार आहे.

पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानी असलेल्या प्रणॉयने चौथ्या मानांकित चायनीज तैपेईच्या चोउ टिएन चेनला २१-१५, २१-७ असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. भारताच्या थॉमस चषक जेतेपदात मोलाची भूमिका बजावणाऱ्या प्रणॉयपुढे उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित जॉनटन ख्रिस्टीचे आव्हान असेल. पारुपल्ली कश्यपचे आव्हान मात्र संपुष्टात आले. त्याला थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्नकडून १९-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.

सात्विक-चिरागची माघार

सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीच्या सामन्यातून माघार घेतल्याने गोह झे फेई आणि नूर इझुद्दिन या स्थानिक जोडीला उपांत्यपूर्व फेरीत पुढे चाल मिळाली. ‘‘सात्विकला दुखापत झाली होती. तो त्यामधून सावरला असला तरीही खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यातच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जवळ असल्याने प्रशिक्षक आणि फिजिओ यांनी त्याला न खेळण्याचा सल्ला दिला,’’ असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.