Sachin Tendulkar on Rohit Sharma: भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत रोहितने निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर अनेकांनी रोहित शर्माबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. आयपीएल संपल्यानंतर पुढील महिन्यात भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या आधीच रोहित शर्माने कसोटीला अलविदा करत यापुढे एकदिवसीय सामने खेळणार असल्याचे सांगितले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रोहित शर्माच्या निर्णयानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. रोहित शर्माने २०१३ साली ईडन गार्डन्सच्या मैदानात वेस्ट इंडिजविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात सचिन तेंडुलकरने त्याला पदार्पणाची कॅप देऊन त्याचे संघात स्वागत केले होते.

सचिन तेंडुलकरने पोस्टमध्ये लिहिले, “२०१३ साली ईडन गार्डन्सच्या मैदानावर मी तुला कसोटी कॅप दिल्याचा दिवस अजूनही मला आठवतोय. त्याचबरोबर वानखेडे स्टेडियममध्येही आपण एकत्र असल्याचे दिवस आठवले. तुझा आजवरचा प्रवास अतिशय उल्लेखनीय होता. तेव्हापासून आजवर तू भारतीय क्रिकेटसाठी एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून उत्तम योगदान दिले आहेस. तुझ्या कसोटी कारकिर्दीतही चांगली कामगिरी केलीस. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा..”

रोहित शर्माने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. पुढच्या कसोटीतही शतक ठोकून त्याने एक विशेष कामगिरी केली. त्यानंतर, पुढील ६ वर्षे, तो या फॉरमॅटमध्ये संघर्ष करत राहिला आणि संघात सतत आत-बाहेर होताना दिसला.

कशी होती कारकिर्द?

६७ कसोटी सामन्यात रोहित शर्माने ४०.५७ च्या सरासरीने ४,३०१ धावा केल्या आहेत. या कारकिर्दीत त्याने १२ शतक ठोकले आहेत. २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरोधात सर्वाधिक २१२ केल्या होत्या. कर्णधार म्हणून त्याने भारतीय संघाचे २४ कसोटी सामन्यात नेतृत्व केले. त्यापैकी १२ कसोटीत विजय मिळाला. तर नऊमध्ये पराभव आणि तीन कसोटी अनिर्णित राहिल्या.

२०२४ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने बार्बाडोस येथे आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजय मिळाला होता.

मागच्या वर्षी मेलबर्न येथे झालेला कसोटी सामना रोहित शर्माचा शेवटचा सामना ठरला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांनी पराभव केला. भारताने २-१ ने मालिका गमावली होती. या मालिकेत पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहने रोहित शर्माच्या अनुपस्थित प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते. रोहित शर्माला दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे तो अचानक भारतात आला होता.