सुंचेयोन : प्रतिभावान युवा खेळाडू लक्ष्य सेन आणि दोन ऑलिम्पिक पदकविजेता पी.व्ही. सिंधू यांच्यावर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ५०० दर्जा) भारताची भिस्त असेल.

जर्मन खुली स्पर्धा आणि ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा लक्ष्य यंदा दमदार कामगिरी करत आहे. पहिल्या फेरीत त्याचा चीनच्या लु गुआंग झूशी सामना होणार आहे. जेतेपद पटकावण्यासाठी लक्ष्यला अव्वल मानांकित अँथनी गिंटिंग आणि तिसरा मानांकित जॉनथन ख्रिस्टी या इंडोनेशियन खेळाडूंसह जागतिक स्पर्धेतील विजेता लोह कीन येव्ह आणि मलेशियाचा दुसरा मानांकित ली झी जिया यांसारख्या खेळाडूंचे आव्हान असेल.एचएस प्रणॉय पहिल्या फेरीत मलेशियाच्या चीम जून वेशी, तर पाचवा मानांकित किदम्बी श्रीकांतचा मलेशियाच्या लिव डॅरेनशी खेळेल.

सिंधू महिला एकेरीत अमेरिकेच्या लॉरेन लॅमविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारताची दुसरी आघाडीची खेळाडू सायना नेहवालचा जपानच्या असुका ताकाहाशीसोबत सामना होईल.