IND vs AUS, World Cup 2023: भारताने विश्वचषक २०२३ची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला होता. २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात ही एखाद्या वाईट स्वप्नासारखी झाली. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे तिन्ही फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताला पराभवाचा धोका निर्माण झाला होता पण विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची भक्कम भागीदारी करून टीम इंडियाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. सामन्यानंतर रोहित शर्मानेही कबूल केले की मी सुरुवातीला नर्व्हस होतो. या विजयानंतरही तो नाराज असून त्याने एक आश्चर्यचकित करणारे विधान केले आहे.

रोहित शर्मा म्हणाला, “मला जिंकल्यानंतर जरा बरे वाटत आहे. स्पर्धेची सुरुवात करण्यासाही हा सामना चांगला झाला. मला वाटले की आम्ही हा सामना सहज जिंकू पण तसे झाले नाही, विशेषत: फलंदाजी करताना २ धावांवर जेव्हा तीन विकेट्स पडल्या तेव्हा मी चिंतेत होतो. भारतीय संघाने पहिल्या षटकातच इशान किशनची विकेट गमावली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकात मी आणि श्रेयस अय्यर आम्ही बाद झालो. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद २ धावा अशी होती. मी खूप घाबरलो होतो. तुम्हाला तुमच्या डावाची सुरुवात अशी कधीच करू वाटणार नाही. याचे श्रेय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जाते. कारण, त्यांनी चांगली लाईन आणि लेंथवर  गोलंदाजी केली.”

हेही वाचा: IND vs AUS, World Cup: विश्वचषकात भारताची विजयी सलामी! विराट-राहुलच्या दमदार खेळीपुढे ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे, सहा विकेट्सने शानदार विजय

पुढे हिटमॅन रोहित म्हणाला, “क्षेत्ररक्षणात…आम्ही प्रत्येक खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना पाहिले. अशा दमट हवामानाच्या परिस्थितीत हे सोपे नाही. आमच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला वापर केला. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना अधिक मदत आहे. आम्हाला माहिती होते की, इथे प्रत्येकाला मदत मिळेल. इतकेच नाही, तर वेगवान गोलंदाजांनाही यश मिळाले, फिरकीपटूंनी चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी केली आणि एकूणच हा शानदार प्रयत्न होता.”

भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “मी सुरुवातीला नर्व्हस होतो. तुम्हाला अशी इनिंग सुरू करावी असे स्वप्नात देखील वाटणार नाही. याचे संपूर्ण श्रेय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जाते कारण त्यांनी उत्तम गोलंदाजी केली पण आम्ही खराब शॉट्सही खेळले, हे मान्यच करावे लागेल. जेव्हा तुमच्याकडे असे लक्ष्य असेल तेव्हा तुम्हाला पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या असतात. मात्र, त्याचे श्रेय विराट कोहली आणि के.एल. राहुल यांना जाते, त्यांनी लक्ष्याचा पाठलाग कसा केला? हे आपण सर्वांनी पाहिलेच आहे. देशातील वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेणं हे एक संघ म्हणून आमच्यासाठी हे एक आव्हान असेल. जो परिस्थितीशी जुळवून घेईल त्याला आणखी काम करावं लागेल.”

हेही वाचा: IND vs AUS, World Cup: विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी कॅप्टन रोहित झाला भावूक; म्हणाला, “भारतीय खेळाडू होणे सोपे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे रोहित शर्मा म्हणाला की, “चेन्नई कधीच निराश करत नाही. ते क्रिकेटवर खूप प्रेम करतात. चाहत्यांसाठी त्या उकाड्यात बसणे आणि बाहेर येऊन संघाचे मनोबल वाढवणे, प्रोत्साहन करणे, हे खूप काही सांगून जाते.” या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ४९.३ षटकात सर्व विकेट्स गमावत १९९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४१.२ षटकात ४ बाद २०१ धावा करून सामना ६ विकेट्सने खिशात घातला. या विजयात विराट कोहली आणि के.एल. राहुल यांचे मोलाचे योगदान होते. विराटने ११६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ८५ धावा केल्या, तर राहुलने ११५ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ९७ धावांचे योगदान दिले. तसेच, हार्दिक पांड्या ११ धावांवर नाबाद राहिला.