भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी चार दिवसांचा एक सराव सामना खेळवण्यात आला. लिसेस्टरशायर क्रिकेट क्लब आणि भारतादरम्यान झालेला हा सराव सामना अनिर्णित राहिला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी लिसेस्टरशायरला विजयासाठी ३६७ धावा करायच्या होत्या. दिवसाचा खेळ संपूपर्यंत त्यांना चार बाद २१९ धावांपर्यंत मजल मारता आली. ६६ षटकांनंतर दोन्ही कर्णधारांनी सामना बरोबरीत सोडण्यासाठी सहमती दिली. दुसऱ्या डावात लिसेस्टरशायरकडून शुबमन गिलने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तर, भारताकडून रविचंद्रन अश्विनने दोन बळी घेतले. याशिवाय, विराट कोहलीने दोन्ही डावांमध्ये दमदार खेळी करत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत.

भारतीय संघातील सर्व खेळाडूंना सरावाची संधी मिळावी यासाठी काही भारतीय खेळाडू लिसेस्टरशायरच्या संघाकडून खेळले. भारताने पहिल्या डावात आठ बाद २४६ धावा केल्या होत्या. यानंतर लिसेस्टरशायरचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव सात बाद ३६४ धावांवर घोषित केला. अशा प्रकारे लिसेस्टरशायरला विजयासाठी ३६७ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

हेही वाचा – IND vs ENG: रोहितच्या जागी पुन्हा विराटला कर्णधार करा! सोशल मीडियावर चाहत्यांनी केली मागणी

दुसऱ्या डावात शुभमन गिलने ७७ चेंडूत ६२ धावा केल्या. त्याला अश्विनने त्रिफळाचित केले. कोविड-१९ मुळे अश्विन या सामन्यात खेळत नव्हता. पण, शेवटच्या दिवशी त्याला सरावाची संधी देण्यात आली होती.

भारताकडून दुसऱ्या डावात माजी कर्णधार विराट कोहलीने ६७ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ६२ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ५६ धावा केल्या. पुजारा लिसेस्टरशायर संघात होता. पण, त्याने सरावासाठी भारतीय संघाकडूनही फलंदाजी केली. शुभमन गिलच्या बाबतीतही तेच झालं. गिल भारताच्या संघात होता, पण त्याने दुसऱ्या डावात लिसेस्टरशायरसाठीदेखील सलामी दिली.

सराव सामन्यात भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे एजबस्टन कसोटीमध्ये दोन्ही संघांची चांगली जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. एजबस्टनमध्ये १ ते ५ जुलै दरम्यान पाचवा कसोटी सामना होणार आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. चार कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ २-१ ने पुढे होता. तर, करोनामुळे पाचवा सामना होऊ शकला नव्हता.