मुंबई : देशांतर्गत क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचे आयोजन करताना अनेक संस्मरणीय सामन्यांचे साक्षीदार राहिलेले वानखेडे स्टेडियम ५० वर्षांचे झाले. एखाद्या मैदानाचा हा प्रवास केव्हाही कुतुहलाने भरलेला असतो आणि याचीच प्रचिती रविवारी मैदानाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने आली. मिलिंद रेगे, लालचंद राजपूत, शिशिर हट्टंगडी अशा आठवणींच्या कप्प्यात राहिलेल्या खेळाडूंपासून आजही क्रिकेटशी नाळ जोडून राहिलेल्या सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, वसिम जाफर यांच्या उपस्थितीने क्रिकेटची पंढरी मानले गेलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियम दुमदुमून गेले होते.

सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उत्तरार्धात १९ जानेवारीस मुख्य कार्यक्रम होणार असून, त्या वेळे आणखी वलयांकित खेळाडूंच्या उपस्थितीने मैदान उजळून निघेल. वानखेडे स्टेडियमने भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. मैदानाचे योगदान खूप मोठे आहे. रणजी व दुलिप करंडक विजेतेपदापासून कसोटी सामन्यातील विजय आणि २०११ विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद या मैदानाने पाहिले. अशा या अलौकिक ख्याती असलेल्या स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होणे हे माझ्यासाठी अभिमानाचे आहे, अशा शब्दात सुनील गावस्कर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> ‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा

या कार्यक्रमात गावस्कर व माजी खेळाडू विनोद कांबळीसह मुंबईच्या माजी कर्णधारांना या वेळी सन्मानित करण्यात आले. गावस्कर रविवारी झालेल्या या कार्यक्रमात सन्मानित झालेले पहिले कर्णधार होते. त्यांना मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.

‘‘एक सलामी फलंदाज म्हणून मी कधीच सुरुवात चुकवत नाही. शालेय क्रिकेटमधून सुरुवात केल्यानंतर मला संधी दिल्याबद्दल मी ‘एमसीए’चे आभार मानतो. ‘एमसीए’ने मला सदैव पाठिंबा दिल्याने मी आज या स्तरावर पोहचू शकलो. मला इथे बोलावल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो,’’ असे गावस्कर म्हणाले. ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष विजय पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले. माजी भारतीय फलंदाज विनोद कांबळीच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. कांबळीचे आरोग्य ढासळल्याने २१ डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता कांबळी आजारातून सावरत असून कार्यक्रमाला माजी सहकाऱ्यांशी ते भेटताना दिसले.

मी इंग्लंडविरुद्ध आपले पहिले द्विशतक येथेच झळकावले होते. यानंतर मी आपल्या कारकीर्दीत अनेक शतकी खेळी केल्याची आठवण विनोद कांबळीने सांगितली. कार्यक्रमापूर्वी मुंबई क्रीडा पत्रकार संघटना व ‘एमसीए’ पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या सामन्यात ‘एमसीए’ संघाने विजय नोंदवला.

मुंबईच्या या कर्णधारांचा गौरव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय मांजरेकर, वसिम जाफर, राजू कुलकर्णी, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, मिलिंद रेगे, नीलेश कुलकर्णी, सिद्धेश लाड, शिशिर हट्टंगडी , पृथ्वी शॉ, शोभा पंडित, अरुंधती घोष, दीपा मराठे, अपर्णा कांबळी यासह मुंबईच्या पुरुष व महिला संघाच्या कर्णधारांना सन्मानित करण्यात आले. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर यांच्यासह माजी कर्णधार रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव व डायना एडुल्जीसारखे अन्य दिग्गज खेळाडूंची या कार्यक्रमाला उपस्थिती नसली, तरीही १९ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता आहे.