IND vs ENG 2nd Test Day 1 Updates: एजबेस्टन कसोटीला आज म्हणजेच २ जुलैपासून सुरूवात झाली आहे. भारत-इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान दोन्ही संघाचे खेळाडू या सामन्यातही हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत.
भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत फलंदाजीला उतरला असून संघाने केएल राहुलच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. तर आता यशस्वी जैस्वाल आणि करूण नायरची जोडी खेळत आहे. दरम्यान जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही. तर शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शनलाही संघाबाहेर केलं आहे. तर आकाशदीप, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डीला संधी मिळाली आहे.
इंग्लंडचे माजी फलंदाज वेन लार्किंसचं यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. एजबेस्टन कसोटीच्या सुरूवातीला इंग्लंडचे माजी फलंदाज वेन लार्किंस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वेन लार्किंस यांच्या सन्मानार्थ दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली आहे.
वेन लार्किन्स यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणाऱ्या लार्किन्स यांनी इंग्लंडकडून एकूण १३ कसोटी सामने आणि २५ एकदिवसीय सामने खेळले. त्यांना नेड या नावाने ओळखले जात असे. ते १९७९ ते १९९१ पर्यंत इंग्लंडचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्त्व करताना दिसले. १९७९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही ते संघाचा भाग होते आणि ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसले.
भारताची प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर