माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter भारतात लवकरच Spaces नावाचं एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या फिचरची घोषणा केली होती. अलिकडेच लोकप्रिय झालेल्या Clubhouse अ‍ॅपमधील फिचरप्रमाणेच Spaces हे फिचर आहे.

Spaces या फिचरवर अद्याप कंपनीकडून टेस्टिंग सुरू आहे. हे एक ऑडिओ बेस्ड फिचर असून भारतात आयओएस प्लॅटफॉर्मच्या काही युजर्सना हे फिचर टेस्टिंगसाठी देण्यात आलं आहे. हे फिचर क्लबहाउस ( Clubhouse) प्रमाणेच आहे. यामध्ये स्पीकर आणि मॉडरेटर तुम्हाला निवडता येतो. ट्विटरवर Spaces चा डाटा ३० दिवसांपर्यंत सेव्ह असतो, जेणेकरुन आवश्यकता पडल्यास युजर तो डाटा डाउनलोड करु शकतो. पण जोपर्यंत हा डाटा ट्विटरवर असतो तोपर्यंतच युजरसाठी डाउनलोडचा पर्याय उपलब्ध असतो. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच हे फिचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाईल.

क्लब हाउस काय आहे?
क्लबहाउस एक आवाजावर आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे. हे सामाजिक ऑडियो अ‍ॅप असून केवळ iPhone युजर्ससाठीच हे उपलब्ध आहे. मात्र आयफोन युजर्सनाही केवळ दुसऱ्या युजरकडून इन्व्हाइट आल्यानंतरच हे अ‍ॅप वापरता येतं. एक युजर फक्त दोन जणांनाच इन्व्हाइट करु शकतो.

काय होतं क्लब हाउसमध्ये ?
या अ‍ॅपमध्ये तुम्ही ‘रूम’मध्ये सहभागी होऊ शकतात. तिथे बातम्या, डिजिटल मार्केटिंग किंवा अन्य कोणत्याही विषयावर चर्चा करता येते. अगदी शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा बिटकॉइनसारख्या विषयांवरही तिथे चर्चा होते. तुम्ही तिथे तुमचं मतही मांडू शकतात किंवा इतरांचे फक्त विचार ऐकायचे असतील तर तसाही पर्याय यामध्ये आहे.

ऑडिओ मोडमध्ये लाइव्ह चर्चा :
या रुम्समध्ये एक लाइव्ह चर्चा ऑडिओ मोडमध्ये होते. ऑडिओ चॅट रुमचे मॉडरेटर व चॅटिंगमध्ये सहभागी झालेल्या अन्य सदस्यांची नावं तुम्ही बघू शकतात व त्यांना फॉलो करु शकतात, एखाद्या निवडक विषयाला फॉलो करण्याचा पर्यायही आहे. शिवाय एखाद्या विषयावर तुम्हाला मत मांडायचं असल्यास मॉडरेटरच्या परवानगीनंतर तुम्ही स्वतःचे विचार इतरांसमोर मांडू शकतात. तुम्ही ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटही क्लब हाउस अकाउंटसोबत लिंक करु शकतात. गेल्या वर्षी लाँच झालेलं हे अ‍ॅप सध्या केवळ आयफोन युजरसाठी आहे. अँड्रॉइड युजरसाठी अद्याप अ‍ॅप लाँच झालेलं नाही.