Pakoras with Tea : सकाळ असो किंवा संध्याकाळ, अनेकांना गरमागरम कुरकुरीत पकोड्यांबरोबर चहा पिणे आवडते. खरं तर तळलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि जर हे पदार्थ तुम्ही चहाबरोबर खात असाल तर त्याचा परिणाम पचनक्रिया आणि पोषक तत्वांच्या शोषण क्षमतेवर दिसून येतो, त्यामुळे पकोड्यांबरोबर चहा प्यावा का हा प्रश्न निर्माण होतो. आज आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

चहासह पकोडा खावा का?

मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल येथील क्लिनिकल आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमानी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला याविषयी माहिती दिली. त्या सांगतात की, चहासह पकोडा खाणे हे आरोग्यासाठी चांगले नाही, पण त्यात आले, दालचिनी आणि वेलचीसारख्या पोषक पदार्थांचा समावेश असतो, ज्यामुळे चहाची चव तर वाढतेच पण त्याबरोबर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि चहा अँटी इन्फ्लामेटरी (शरीराच्या वेदना किंवा सूज कमी करण्यासाठी वापरले जाणारे घटक) म्हणून काम करते. बेकिंग आणि एअर फ्रायिंगसारख्या इतर स्वयंपाक पद्धतीचा वापर करून शरीरास निरोगी असलेल्या तेलांमध्ये पकोडे तळले तर याचा आनंद घेता येतो.”

चहा आणि पकोडा आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे वैज्ञानिक कारण काय आहे?

“चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात. जेव्हा पोषक घटकांचा समावेश असलेल्या अन्न पदार्थांबरोबर चहाचे सेवन केले जाते, तेव्हा त्या पदार्थातील लोह आणि कॅल्शियमसारख्या पोषक तत्वांचे शोषण कमी होते. याशिवाय वारंवार गरम केलेल्या तेलात तळलेले पकोडे खाल्ल्याने ट्रान्स फॅटी अॅसिडसुद्धा शरीरात तयार होते,” असे वेदिका प्रेमानी सांगतात.

चहासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावेत?

अनेक जण चहाबरोबर बिस्किटे आणि कुकीज खातात, ज्यामध्ये फॅट्स आणि साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

चहाबरोबर आणखी आवडीने खाल्ला जाणारा लोकप्रिय नाश्ता म्हणजे समोसा, ज्यामध्ये फॅट्सचे प्रमाण सर्वाधिक असते.

ब्रेडसारखे इतर बेकरीचे पदार्थसुद्धा चहाबरोबर खाणे योग्य नाही, कारण त्यात सोडियम, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते.

चहाबरोबर खाता येईल असे आरोग्यदायी पदार्थ कोणते आहेत?

“हेल्दी नाश्त्याच्या पर्यायांमध्ये बेक्ड रागी चिप्स, ढोकळा, मखाना, चना चाट आणि हंग दह्यासह खाकरा, एअर फ्राइड भाज्यासुद्धा पकोड्यांना चांगले आरोग्यदायी पर्याय असू शकतात,” असे वेदिका प्रेमानी सांगतात.

त्यांनी हेल्दी चहाचे काही पर्यायसुद्धा सुचवले आहेत, जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

कॅमोमाइल चहा : हा चहा त्याच्या आरामदायी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. यामुळे शांत झोप लागते. तणाव कमी होतो.

रोझमेरी चहा : यात असलेले अँटीऑक्सिडंट प्रभावी असतात, जे व्यक्तीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.

हळद आणि आल्याचा चहा : हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चहामध्ये काळी मिरी आणि वेलची पावडर टाका. काळी मिरीमध्ये पिपेरिन (Piperine) नावाचा घटक असतो, जो पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करतो, तसेच वेलची चहाचा ताजेपणा वाढवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.