lp06उत्तम लेख

‘लोकप्रभा’च्या २४ एप्रिलच्या अंकातील तेजाली कुंटे यांचा ‘तारे डान्स फ्लोअरवरचे’ हा लेख वाचला, आवडला. कोणताही सिनेमा बघताना एखाद्या गाण्यातल्या बॅक डान्सर्सकडे विशेष लक्ष जात नसायचं. पण, त्यांच्याबाबत कुतूहल मात्र वाटायचं. त्यांना बडय़ा कलाकारासोबत नाचायला मिळतं, मोठय़ा पडद्यावर झळकायला मिळतं, ओळख तयार होते; असे विचार असायचे. पण, त्यांची मेहनत समोर यायची नाही. लेखात उल्लेख केलेल्या साहाय्यक नर्तक-नर्तिकांच्या मेहनतीबाबत वाचलं. सिनेमांमध्ये झळकतात म्हणून त्यांचं अप्रूप वाटतं. पण, त्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत वाखाणण्यासारखी आहे. ज्यांना या क्षेत्रात अभिनयात करिअर करायचं असतं तेही सुरुवातीला बॅक डान्सर्स म्हणून काम करतात हे वाचून कौतुक वाटलं. या लेखामुळे या डान्सर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. बॉलीवूडचे लोकप्रिय गाणी त्यातल्या कलाकारांमुळे प्रेक्षकांना ओळखीची असतात. पण, ती आकर्षक दिसतात कारण त्याच कलाकारांच्या मागे असतात त्यांचे साहाय्यक. त्यांच्याबाबत पूर्वी फारसं कुठे वाचनात आलेलं नव्हतं. ‘लोकप्रभा’ने त्याबाबत लेख लिहिला.
– मानसी कोलते, मुंबई.

lp08मुद्दे पटले
गेल्या काही दिवसांमध्ये दीपिका पदुकोणच्या ‘माय लाइफ माय चॉइस’ या व्हिडीओने सोशल साइट्सवर धुमाकूळ घातला होता. या व्हिडीओवर उलटसुलट चर्चाही झाली. अनेकांनी आपापली मतं त्याच सोशल नेटवर्किंग साइटवर मांडलीही. ‘लोकप्रभा’च्या १७ एप्रिलच्या अंकातल्या ‘फेमिनिझमच्या बुरख्याआडचा मुखवटा’ ही कव्हर स्टोरी वाचली. यात वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडलेले मुद्दे पटले. तरुण, कलाकार, सामान्य माणूस अशा विविध वयोगटांतील, क्षेत्रातील लोकांची मतं त्यात आल्यामुळे कव्हरस्टोरी सर्वसमावेशक झाली आहे. वैशाली चिटणीस यांचा ‘फेमिनिझमच्या बुरख्याआडचा मुखवटा’ आणि प्राची साटम यांचा ‘दीपिकाच्या खांद्यावरून, चॉइस कुणाचा’ हे दोन्ही लेख खूप काही सांगून गेले. यात अनेक मुद्दय़ांवर प्रकाश टाकला आहे. एखाद्या सेलेब्रिटीने विशिष्ट मुद्दा मांडला की त्यावर चटकन विश्वास बसतो. त्याने किंवा तिने मांडलेले मुद्दे पटतात. पण, या कव्हर स्टोरीमध्ये त्या व्हिडीओमागची गणितं मांडल्यामुळे खऱ्या अर्थाने त्याआडचा मुखवटा पुढे आला. तसंच कलाकार, तरुणाई यांची मतं वाचून या विषयाचे विविध दृष्टिकोन समोर आले.
रसिका माळी, पुणे.

lp09‘विठोबाची माय’ने जागवली आठवण!
१७ एप्रिलच्या अंकातील ब्लॉगर्स कट्टामधील ‘विठोबाची माय’ हा धनंजय देशपांडे यांचा लेख आवडला. अशीच एक आठवण आम्ही मित्रांनी अनुभवलेली.
शालेय जीवनात आमच्या एका मित्राच्या घरी आम्ही पाच-सहा मित्र खेळायला जमायचो. इमारतीच्या मोकळय़ा पॅसेजमध्ये क्रिकेट, लगोरी, भोवरा असे खेळ खेळताना दंगामस्ती चालायची. बाजूच्याच खोलीत आमच्या मित्रांच्या दंगामस्तीने विचलित न होता एक गृहस्थ टेबल- खुर्चीवर शांतपणे काहीतरी लेखन करताना दिसायचे. एका वर्षी मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यावर नव्या वर्षांच्या मराठीच्या पुस्तकात ‘पाडवा गोड झाला’ ही कथा समाविष्ट केलेली होती. आमच्या मित्राने एक दिवस ‘पाडवा गोड झाला’ या कथेचे लेखक कोण आहेत हे माहिती आहे का? असे खेळायला जमलेल्या मित्रांना विचारले. सर्वाचे उत्तर नाही असे आले. मित्र म्हणाला, आपण दंगामस्ती करताना कायम लिखाण करीत बसलेलेच या धडय़ाचे लेखक आहेत, त्यांचे नाव ‘अंबादास अग्निहोत्री’ अग्निहोत्री. हे सुप्रसिद्ध कथालेखक आहेत हे कळण्याचे तेव्हा वय नव्हते, पण मराठीच्या पुस्तकात धडा असलेले लेखक आपण रोज पाहतो हे ऐकूण आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर आमच्या मित्राच्या ओळखीने आम्ही सर्व मित्रांनी अंबादास अग्निहोत्री यांची भेट घेऊन धडा आवडल्याचे त्यांना सांगितले. त्यांनीदेखील त्यांच्या काही बालकथांची पुस्तके आम्हा मित्रांना वाचण्यास दिली. ही आठवण कायम स्मरणात राहील.
– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण.

lp07प्रेरणादायी अंक
२७ मार्चचा वर्धापन दिन विशेषांक मुखपृष्ठावरील ‘केल्याने होत आहे रे..’ या ओळी वाचूनच खूप आवडला. विनायक परब यांचा ‘मथितार्थ’ ही उत्तम. तुमच्या नवीन संकल्पना, विभाग निश्चितच स्वागतार्ह आहेत. आम्हा वाचकांसाठीही ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हा मंत्र खूप मोठय़ा उर्जेचा स्रोत ठरेल यात वाद नाही. सर्वच लेख वेळेअभावी अजून वाचून झाले नाहीत. पण जे काही वाचले व आढावा घेतला ते सर्वच सकारात्मक आहे. विविध म्युझिक बॅण्डस्ची उत्साहपूर्ण झलक पाहावयास मिळाली, कालाय तस्मै नम: एका दर्जेदार अंकाचे नियमित वाचक असल्यानं दिवसागणिक ज्ञानात भर पडतेय याचं समाधान आहे. – रिमा चंद्रशेखर कुलकर्णी, पुणे.

वेगळा पायंडा
‘लोकप्रभे’चा वर्धापन दिन विशेषांक हा प्रेरणादायी अंक ठरला आहे. ‘केल्याने होत आहे रे..!’,‘ पुढाकार समूहाचा’, ‘देण्यातला आनंद’ या शीर्षकाखालील सर्वच लेख प्रेरणादायी, वाचनीय आहेत. सर्वसामान्य माणूस काय करू शकतो याची प्रचीती आली. आपणास छोटी वाटणारी एखादी गोष्टी समाजाला किती फायदेशीर ठरते तसेच त्यासाठी कसे कष्ट घ्यावे याची माहिती २७ मार्चच्या वर्धापन दिन विशेषांकात मिळाली आहे. एक आगळावेगळा पायंडा या लेखातून समाजापुढे मांडला गेला आहे. त्यामुळे हा अंक प्रेरणादायीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये!
संतोष राऊत, खंडाळा, सातारा.

वेगळ्या अंगाने उजाळा
कौटिल्याने सांगितलेली राजनीतीची सूत्रं आणि शिवरायांचा प्रत्यक्ष राज्यव्यवहार यांची तुलना करणारे आसावरी बापट यांचं सदर फार वाचनीय आहे. शिवरायांची राजनीती किती विवेकी, परिपक्व आणि बुद्धिमान होती हे सगळीच मराठी माणसं अगदी शालेय काळापासून ऐकत वाचत आलेली असतात. पण त्यांच्या सगळ्याच कर्तृत्वाला असामान्यपणाचे जे वलय आहे, ते कितीही वेळा, कितीही वेगवेगळ्या पद्धतीने समजलं तरीही ते अपुरंच वाटतं. म्हणूनच शिवरायांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला वेगळ्या अंगाने उजाळा दिल्याबद्दल लेखिकेचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत.
– राधा पालव, अलिबाग.

डॉक्टरांची सदरे वाचनीय
गजानन रत्नपारखी यांचे हृदयस्पंदन, डॉ. अविनाश सुपे यांचे कशासाठी, पोटासाठी, डॉ. जान्हवी केदारे यांचे सदर, खडीवाले वैद्य यांचे औषधाविना उपचार ही ‘लोकप्रभा’तील या वर्षांतील सदरे वाचनीय आहेत. पण ती वाचताना मागील वर्षांतील डॉ. उज्ज्वला दळवी, डॉ. प्रदीप आवटे, डॉ. विजय कदम, डॉ. राजेश यांच्या सदरांचीही आवर्जून आठवण येते. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना लिहिते करण्याचा ‘लोकप्रभा’चा उपक्रम स्तुत्य आहे.
– मंगेश आवताडे, सोलापूर.

माहिती उपयुक्त
‘टेकफंडा’ या सदरातून टीव्ही, मोबाइल, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन ही उपकरणं घेताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या असतात आणि ही खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची असते ही माहिती दिली जात आहे. लेखक प्रशांत जोशी ही सगळी माहिती अतिशय सोप्या पद्धतीने मांडतात. त्यातील तांत्रिक बाबी सहजपणे समजावून सांगतात. या प्रकारची खरेदी करताना ही सगळी माहिती निश्चितच अतिशय उपयुक्त ठरेल.
– जीवन मदाने, नाशिक

हे विषय का नाहीत?
‘लोकप्रभा’मधून वेगवेगळ्या विषयांवरची भरपूर माहिती मिळते. पण आर्थिक विषयांवर एकही सदर नाही, राजकीय विषयांवर ‘लोकप्रभा’ एखादा अपवाद वगळता फारसे भाष्य करत नाही, आंतरराष्ट्रीय विषयांच्या तर आसपासही फिरकत नाही ही कमतरता जा़णवते.
अतुल देशपांडे, कोरेगाव पार्क, पुणे.

lp10आहे मनोहर तरीही..
‘लोकप्रभा’ साप्ताहिक गेल्या ५-६ महिन्यांपासून नियमित वाचनात येत आहे. आपण प्रत्येक अंक अधिकाधिक वाचनीय अन् रंजक निघेल याबद्दल प्रयत्नशील असता, हे पाहून समाधान वाटते. परंतु देअर इज नो लिमिट टू एक्सलन्स हे आपणसुद्धा मान्य कराल!
‘डोके लढवा’अंतर्गत आठवीपर्यंतचे अंकगणितातील प्रश्न (सरासरी, सरळव्याज इ.) देण्यात येतात. यात बदल व्हायला हवा. याऐवजी लॉजिकल कोडी देण्याची प्रथा सुरू करावी. लॉजिकल प्रश्न म्हणजे ओळीने चार घरांत राहणारे चार मित्र, त्यांचे व्यवसाय, घराचे रंग व आवडते खेळ वेगळे याबद्दल काही सूचना देऊन संपूर्ण चित्र स्पष्ट करण्यास सांगणे.
‘शब्दकोडे’ फारसे रंजक व व्यायाम देणारे वाटत नाही. काही शब्द (उदा. रनवे) पुन्हा-पुन्हा येतात. लोकप्रभा महाराष्ट्रा बाहेरसुद्धा वाचला जातो. त्यामुळे ‘ठाण्याजवळून वाहणारी नदी’ सारखे विधान येऊ नये ही अपेक्षा.
सुकुमार जैन, भोपाळ.

मनोरंजनावर अतिभर
मी गेली अनेक वर्षे ‘लोकप्रभा’ वाचतो. गेल्या वर्षभरात ‘लोकप्रभा’त जाणवलेला बदल म्हणजे मनोरंजनविषयक लिखाणावर जास्त भर दिला जातो आहे. या विषयाला जास्त वाचक असतात हे खरं आहे. पण ‘लोकप्रभा’ने अशा पद्धतीने वाचकशरण का व्हावं असा प्रश्न पडतो. ज्यांना मनोरंजनच हवं आहे, त्यांच्यासाठी टीव्ही वाहिन्या हे माध्यम आहे. तिथे रात्रंदिवस मनोरंजनाचा रतीब सुरू असतो. मुद्रित माध्यमांकडून वाचकांना अधिक गंभीर विषयांच्या मांडणीची अपेक्षा आहे. त्यामुळे ‘लोकप्रभा’ने टीव्ही, बॉलिवूडचा विळखा सोडवून घ्यावा आणि इतर विषयांना जास्त वाव द्यावा अशी सूचना.
– चैतन्य पाटील, पुणे.