lp37दिवाळी २०१४
गालाला खळी पाडून हवी, नाक असंच हवे, ओठ तसेच हवेत असा आग्रह धरून केल्या जाणाऱ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या प्लास्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रिया म्हणजे एक प्रकारे मेक टू ऑर्डर. म्हणजे टेलरकडे जाऊन हवे तसे कपडे बेतून घेता येतात तसे आपले शरीर बेतून घेणे. आपल्या समाजात वाढत असलेल्या या प्रकारची पाळेमुळे कशात आहेत? त्यातले धोके काय आहेत?

हल्ली कोणाला व्यवसायाची गरज म्हणून, कोणाला प्रतिमा उंचावण्याची निकड म्हणून, तर कोणाला आणखीन कोणासारखं तरी दिसायची हौस म्हणून स्वत:च्या शरीरात बदल करून घेण्याची गरज निर्माण होताना दिसत आहे. खरं तर त्यासाठीचं मूळ असणारी रिकन्स्ट्रक्टिव्ह प्लास्टिक सर्जरी ही भारताने वैद्यकीय जगताला दिलेली देन, पण आज तीच उलटपावली आपल्याकडे मेक टू ऑर्डरच्या स्वरूपात प्रस्थापित होत आहे. अर्थात म्हणूनच हे सारं कसं विकसित झालं आणि आजच्या मेक टू ऑर्डपर्यंतचा प्रवास कसा झाला, आज या क्षेत्रात काय सुरू आहे, भविष्य काय आहे यावर एक दृष्टिक्षेप टाकणे उचित ठरू शकेल.
प्लास्टिक सर्जरीचं ज्ञान भारतातूनच जगभरात गेल्याचं जगन्मान्य झालं आहे. सुश्रुताने इ.स. पूर्व ७०० वर्षांपूर्वीे केलेल्या प्लास्टिक सर्जरीचे उल्लेख आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये सापडतात. सुश्रुताच्या कार्यावर लिखाणदेखील भरपूर झालं आहे. पण आपल्याकडे ज्ञानाच्या नोंदणीकरणाची प्रथाच नाही. कालांतराने राजाश्रय न मिळाल्यामुळे अशा अनेक ज्ञानभांडारांचा संदर्भ कालौघात लुप्त होत गेला. आणि आपल्याच प्रगत ज्ञानापासून आपण पारखे होत गेलो. तरीदेखील काही विद्याशाखांमधील ज्ञान काही प्रमाणात पिढीजात वारशातून मौखिक पद्धतीने संक्रमित होत गेलं.
अर्थात इतपतच आपली माहिती सीमित होते. मग हा सारा प्रवास झाला कसा? त्याबद्दल प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. मुकुंद थत्ते सांगतात, ‘‘आपल्याकडील या ज्ञानाचा मागोवा घेताना लक्षात येतं की ही परंपरा शूर्पणखेपर्यंत मागे जाते. भारतात नाक कापणं ही शिक्षा होती, अवमान करण्याचं साधन होतं. (इतर देशांत अशी प्रथा नव्हती) शूर्पणखा हे प्रतीक अथवा मिथक मानू या. पण हे नाक पूर्ववत करणं हे तत्कालीन वैद्यकशास्त्राला आव्हान होतं. त्यातूनच गालाची अथवा कपाळाची त्वचा वापरून ती कापलेल्या नाकाच्या जागी वापरून नाक पूर्ववत करण्याची शस्त्रक्रिया करण्याची पद्धती आपल्याकडे विकसित झाली. हीच आपली इंडियन ऱ्हायनोप्लास्टी, तीच आजची रिकन्स्ट्रक्टिव्ह ऱ्हायनोप्लास्टी. विद्रूप झालेलं नाक पूर्ववत करणं हे त्यात अपेक्षित होतं. आताच्या ऱ्हायनोप्लास्टीची मुळं तेथपर्यंत पोहचतात. त्यामुळेच प्लास्टिक सर्जरी भारताकडून जगाकडे गेली आहे हे जगन्मान्य आहे.’’ पण आपल्याकडील नोंदीकरणाच्या अक्षम्य गलथानापणामुळे हे सारं ज्ञान केवळ मौखिक पातळीवरच राहिलं. मात्र या पारंपरिक इंडियन ऱ्हायनोप्लास्टीचा वापर नंतरदेखील होत होता त्याची एक महत्त्वाची नोंद युरोपातील जंटलमन मासिकात झाल्याची माहिती डॉ. थत्ते देतात. १८०५ साली जंटलमन मासिकात पुण्याजवळील एका कुंभाराने केलेल्या नाकावरील शस्त्रक्रियेचा साद्यंत अहवाल छापून आला होता.
या अहवालात नेमकं काय होतं? कंपनी सरकारच्या सैन्यात कावसजी नावाचा एक ड्रायव्हर होता. टिपूबरोबरच्या युद्धात टिपूच्या सैनिकांनी त्याचं नाक कापलं. त्या तुटक्या नाकावर पुण्याजवळच्या एका कुंभाराने उपचार करून ते पूर्ववत केलं. त्यासाठी त्याने आधी तुटलेलं नाक मातीने पूर्ण केलं. मग ती माती कपाळावर पसरवली व किती त्वचा लागेल याचा अंदाज घेतला. आणि तेवढी त्वचा वापरून ऱ्हायनोप्लास्टी केली. या इंडियन ऱ्हायनोप्लास्टीचा सारा अहवाल जंटलमन मासिकात दिला आहे. डॉ. थत्ते सांगतात, साहजिकच युरोपातील वैद्यक जगतात याविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. त्याच वेळी इटलीत ळंॠ’्रूं९९्र कुटुंब होत तेदेखील अशा शस्त्रक्रिया करत असे. त्यांच्याकडे हे ज्ञान अरबांकडून आलं होतं, अरबांनी ते भारतातून मिळवल होतं. १६ व्या शतकापासून ते कुटुंब हे काम करत असे.
जंटलमनमधील वृत्तांत आणि इटालियन कुटुंबाची कार्यपद्धती या दोहोंच्या माध्यमातून कालांतराने आजच्या मॉडर्न प्लास्टिक सर्जरीचा विकास झाल्याचं डॉ. थत्ते नमूद करतात. त्यामुळेच भारतातून हे शास्त्र आल्याचं पाश्चिमात्यदेखील मान्य करतात. पण १९ व्या शतकात एक विद्याशाखा म्हणून तिचा विकास झाला नव्हता. तो होण्यामध्ये पहिल्या महायुद्धातील काही घटना महत्त्वाच्या ठरतात. त्याविषयी थत्ते सांगतात की, ‘‘पहिल्या महायुद्धात अनेक सैनिक जखमी होऊनदेखील मोटारींच्या अ‍ॅम्ब्युलन्समुळे बेस कॅम्पला जिवंत परतण्याचं प्रमाण बरंच होतं. या सैनिकांच्या तुटलेल्या अवयवांवर उपचार करताना आर्मी सर्जनपुढे प्रश्न निर्माण झाले. सैनिकांवर उपचार करताना गरजेतून काही तंत्र विकसित झालं. त्या सर्जनपैकीच एक होते हॅरॉल्ड गिलिस. त्यांनी १९१७ साली हे सविस्तर प्रकाशित केलं. त्याच वेळी रशियात फिलातो नावाचे सर्जन होते. तेदेखील यावर काम करत होते. त्यांनीदेखील १९१७ लाच या सर्जरीबद्दल मांडले आहे. पण इंग्रज राज्यकर्ते होते त्यामुळे जेता हाच इतिहास लिहितो या न्यायाने हॅरॉल्ड गिलिसचं नाव पुढं आले. हॅरॉल्ड गिलिस हे फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी म्हणून ओळखले जातात.’’
हॅरॉल्ड गिलिस यांच्या भाषेत सांगायचे तर शरीराच्या आकारबंधाला असलेले व्यंग सुधारणे म्हणजे रिकन्स्ट्रक्शन. म्हणजचे जर एखादी व्यक्ती भाजली असेल, अपघात झाला असेल आणि त्यामध्ये एखाद्या अवयवाला इजा पोहचली असेल तर त्वचा अथवा मांसपेशी (त्याचा शरीरातील अथवा बाहेरून आणून) तो अवयव पूर्ववत करणे हे त्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळेच त्याला रिकन्स्ट्रक्शन सर्जरी असे म्हटले जाते. पण जे नॉर्मल आहे त्याचे सौंदर्यवृद्धीकरण केले तर ती एस्थेटिक सर्जरी ठरते. मेक टू ऑर्डर म्हणजे आपल्याला हवे तसे हव्या त्या पद्धतीने स्वत:मध्ये बदल करणे या संकल्पनेचा विकास त्यातूनच झाला आहे. मात्र त्याला कॉस्मेटिक सर्जरी संबोधणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे डॉक्टर थत्ते नमूद करतात. सौंदर्यवृद्धीकरणासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या प्लास्टिक सर्जरीच्या परिघातच होत्या. दुसरे असे की टिश्यू हॅण्डलिंग आणि टिश्यू रिस्पेक्टमध्ये जी काळजी, नजर अपेक्षित असते ती प्लास्टिक सर्जनकडे पुरेपूर असते. त्यामुळेच आजच्या मेक टू ऑर्डरची पाळेमुळेदेखील थेट प्लास्टिक सर्जरीकडेच जातात.
रिकन्स्ट्रक्टिव प्लास्टिक सर्जरीकडून आपण मेक टू ऑर्डरकडे आलो ते असे. हे करता येते हे शास्त्राने दाखवून दिले. पण आज ज्या वेगाने सर्वसामान्यांमध्ये मेक टू ऑर्डरचे प्रमाण वाढले आहे त्याची कारणमीमांसा करताना अन्य काही घटकांची भूमिकादेखील तपासावी लागेल. देशातले प्लास्टिक सर्जरीच्या क्षेत्रातील बदल गेली २८ वर्षे डॉ. मुकुंद थत्ते यांनी अभ्यासले आहेत. त्याच अनुषंगाने ते मेक टू ऑर्डरच्या आजच्या परिस्थितीसाठी दोन महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भर देतात. ‘‘एक म्हणजे आपल्या प्रसिद्धी माध्यमांतून होणारं प्रेझेंटेशन. आपण कसे दिसावे, कसे असावे याचे नमुने सातत्याने आपल्यावर बिंबवण्याचे काम सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी केले. (त्यातही पेज थ्रीचा वाटा अधिक) त्यामुळे चांगले दिसण्याचे मानदंड म्हणून सर्वसामान्य त्याकडे पाहू लागले. त्यातूनच आपणदेखील असेच दिसावे ही इच्छा निर्माण झाली. पण नुसती इच्छा असून भागत नाही. जेव्हा अशा कारणासाठी पैसे खर्च करण्याची ताकद निर्माण झाली तेव्हाच आपसूकच मेक टू ऑर्डरचा जन्म झाला. हा कालावधी साधारण देशातील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेच्या आसपासचा, म्हणजेच १९९१ नंतरचा. २००० पासून त्याला आणखीनच वेग आला. मूलभूत गरजा भागवून इतर खर्च करण्याइतपत उत्पन्न या काळात मिळू लागले. प्रसिद्धी माध्यमातून आपल्यापुढे उभे राहिलेले गोंडस चित्र आणि हाताशी नव्याने तयार झालेले अतिरिक्त उत्पन्न या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक ठरल्या. त्यातूनच आपल्याकडे मेक टू ऑर्डरचा सिलसिला सुरू झाला.’’
आज देशात मेक टू ऑर्डरची मागणी अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी आहे. ऱ्हायनोप्लास्टी ही त्यामध्ये सर्वात जुनी शस्त्रक्रिया. जगात सुमारे १००-१२५ वर्षांपासून, तर भारतात गेल्या ५०-६० वर्षांपासून ही शस्त्रक्रिया सुरू आहे. दुखापत झालेले, व्यंग असलेले नाक दुरुस्त केले जाते तेव्हा ती रिकन्स्ट्रक्टिव ऱ्हायनोप्लास्टी असते, तर सुस्थितीतील नाकाची ठेवण बदलणे ही एस्थेटिक ऱ्हायनोप्लास्टी ठरते.
आपल्या इतिहासातील ऱ्हायनोप्लास्टीचा संदर्भ जरी खूप जुना असला तरी जेव्हा भारतात पन्नास- साठ वर्षांपूर्वी मॉडर्न ऱ्हायनोप्लास्टीला सुरुवात झाली तेव्हा अनेक नवीन गोष्टी समोर आल्याचे डॉ. थत्ते सांगतात. ‘‘आपणा भारतीयांचे नाक वेगळे आहे. आपली त्वचा जाड आहे. त्यामुळे पाश्चिमात्यांची पद्धत आपल्याला उपयोगी पडत नाही. त्यातून योग्य तो परिणाम मिळत नाही. पाश्चात्त्यांची त्वचा पातळ असल्यामुळे खालच्या भागात काम केले की वरचे स्केलेटन घरंगळून पडते. तर आपली त्वचा जाड असून तिला स्वत:ची मेमरी असते. परिणामी त्वचेच्या खालच्या भागात केलेल्या कामाचा परिणाम दिसायला सहा महिने लागतात. आपल्या रुग्णांना अनेक वेळा हे पटतच नाही. त्यातूनच भारतीय ऱ्हायनोप्लास्टी वेगळ्या प्रकारे विकसित होत आहे.’’ अनेक परिषदांमधून यावर विस्तृत चर्चा झाली आहे, मात्र पुस्तकरूपाने वगैरे लिखाण झाले नाही.
lp38मेक टू ऑर्डरमधील दुसरा प्रकार म्हणजे फेस लिफ्िंटग. गुरुत्वाकर्षणामुळे आपली त्वचा खाली खेचली जात असते, त्यातच फॅट उतरण्यामुळे चेहऱ्याची त्वचा लुळी पडते. त्यासाठी फिलर्स किंवा बोटोक्स वापरले जाते. बोटोक्स (बुटोलीने टॉक्सिक) हे एक प्रकारचे विषच आहे. त्वचा ओघळत असेल, सुरकुत्या पडल्या असल्या तर त्या ठिकाणी बोटोक्स इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे संबंधित भागातील स्नायू पॅरलाइज होतात आणि ओढले जातात. तर फिलर्सच्या वापराने ओठांना आकार देणे, गालांचा आकार बदलणे, हनुवटीला हवा तो आकार देणे असे उपचार केले जातात.
अर्थात चेहऱ्यावर केल्या जाणाऱ्या या उपचारांबाबत आपण आणि पाश्चिमात्यांमध्ये फरक असल्याचे डॉ. थत्ते दाखवून देतात. ‘‘आपल्याकडे वयाच्या पन्नाशीनंतर चेहऱ्यावरील परिणाम दिसून येतात. पण त्यांच्याकडे वयाच्या तिशी-पस्तिशीतच चेहऱ्यावरील सुरकुत्या दिसू लागतात. डोळ्याच्या बाजूला येणाऱ्या रेषा (क्रो-फीट) हे त्याचेच लक्षण आहे. जेनेटिकली आपली त्वचा जाड असल्यामुळे आपल्याकडे ही समस्या उशिराने उद्भवते.’’
तिसरा प्रकार ब्रेस्ट इम्प्लांट. हा भारतात फारसा लोकप्रिय नाही. स्तनांचा आकार वाढवणे, उभारी देणे यासाठी हे इम्प्लांट वापरले जातात. भारतात मधल्या काळात इम्प्लांट तयार केले जात होते. पण पुरेशी मागणी नसल्यामुळे ते उत्पादन बंद झाले. आज आपल्याला हे इम्प्लांट आयात करावे लागतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचा खर्च वाढतो. ४०-५० हजार रुपये तर फक्त इम्प्लांटसाठीच खर्च येतो. शस्त्रक्रियेचा खर्च वेगळाच. डॉ. मुकुंद थत्ते त्या संदर्भातील आणखीन माहिती देताना सांगतात की, ‘‘हा इम्प्लांटदेखील सात-आठ वर्षांनी बदलावा लागतो. हे ऐकल्यावरच अनेक जण या शस्त्रक्रियेकडे फारसे वळत नाहीत. पण सध्या फॅट ट्रान्स्प्लांटच्या माध्यमातून स्तनांना आकार देण्याचे बरेच प्रयोग केले जात असून त्याला यशदेखील लाभत आहे.’’
सर्वसाधारणपणे ऱ्हायनोप्लास्टी व ब्रेस्ट इम्प्लांट तारुण्यात केली जाते. अर्थात वृद्धापकाळातसुद्धा तारुण्य हवे म्हणून करणारे आहेतच, हा भाग वेगळा.
मेक टू ऑर्डरमधील पुढील महत्त्वाचा आणि ज्याच्यावर सध्या आपल्याकडे प्रचंड संशोधन सुरूआहे तो विषय म्हणजे लायपोसक्शन. अनावश्यक चरबी काढून संबंधित अवयवाला चांगला आकार देणे हे त्यात अपेक्षित आहे.
शरीरातील विविध अवयवांना इम्प्लांटच्या माध्यमातून सुडौल आकार देण्याचा प्रकारदेखील मेक टू ऑर्डरमध्येच येतो पण तो आपल्याकडे फारसा वापरला जात नाही. चेहऱ्यावर, नाकावर, बटक्सवर, काफवर, ब्रेस्टवर याचा वापर होतो. बिकिनीमध्ये काफ अमुक शेपचा दिसावा लागतो म्हणून मॉडेल, सिनेतारका बटक्समध्ये काफ बसवतात. आपल्याकडे पायांतील अंतर कमी करणे वगैरे प्रकारच्या शस्त्रक्रिया तुलनेने कमी आहेत. त्या प्रक्रियेत हाड तोडावे लागते.
थोडक्यात काय जे आहे त्यापेक्षा काही तरी वेगळे, अधिक सुंदर देखणेपण आणणे म्हणजे मेक टू ऑर्डर. जे आहे ते चांगले की वाईट, कसे दिसावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण जे निसर्गाने दिले आहे त्यात व्यंग नसेल तर बदल करण्याची गरज आहे का? असा प्रश्नदेखील यावर उपस्थित होऊ शकतो; पण गरज ही पुन्हा सापेक्ष संकल्पना आहे.

चिनी उत्पादनांचा धोका
आज आपल्याकडील सर्वच बाजारपेठांना जसे चिनी उत्पादनाने घेरले आहे. त्यातून वैद्यकीय शाखादेखील सुटलेली नाही. ब्रेस्ट इम्प्लांटसाठी जो इम्प्लांट वापरला जातो त्याचे उत्पादन आपल्या देशात होत नाही. तो आयात करावा लागतो. त्याची किंमत साधारणपणे चाळीस ते पन्नास हजारांच्या घरात आहे. मात्र चीनवरून स्मगल्ड होऊन येणारा इम्प्लांट चक्क पाच-दहा हजारांतदेखील मिळत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. असे इम्प्लांट खर्चात बचत करणारे असल्यामुळे वापरण्याचा कल वाढू शकतो. अशा वेळी इम्प्लांट फुटणे, त्याचा शरीराला त्रास होणे अशा घटना घडू शकतात. अर्थात, आपल्याकडे त्यावर अभ्यास झाला नाही, त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. तसेच चिनी उत्पादनाचा गुणवत्ता रिपोर्ट नाही, त्याची कसलीही नोंद नाही. बोटॉक्समध्येदेखील चिनी उत्पादन येत असल्याचे डॉक्टर नमूद करतात. थोडक्यात, या सर्वाचा वापर करताना रुग्णाने योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

जे आहे ते नकोय, आहे त्यात समाधान नाही, त्यापेक्षा वेगळे असण्याची गरज आज अनेकांमध्ये तयार झाली आहे. डॉ. थत्ते यासाठी जी दोन महत्त्वाची कारणे सांगतात त्यातील माध्यमांचा समाजावरील परिणाम. या विषयावर पाश्चात्त्यांकडे अनेक सर्वेक्षण अभ्यास झाले आहेत आणि त्यातून आलेली उत्तरे ही थत्ते यांच्या निरीक्षणाला पूरक ठरणारी आहे. डॉ. थत्ते सांगतात, ‘‘प्रसिद्धीमाध्यमांमुळे एका ठरावीक पद्धतीनेच दिसले पाहिजे असा दबाव निर्माण होतो. माध्यमांनी ही गरज आपल्याकडे गळी उतरवली आहे. त्याला जोड डिस्पोजेबल उत्पन्नाची मिळाल्यामुळे मेक टू ऑर्डर वाढत गेले.’’
अर्थात हे प्रमाण वाढत असले तरी त्याच्या चिरकालतेवर भाष्य करताना मेक टू ऑर्डरमधील सर्वच पर्याय कायमस्वरूपी नसल्याचे आवर्जून नमूद करतात. ‘‘ऱ्हायनोप्लास्टी कायमस्वरूपी टिकते, तर ब्रेस्ट इम्प्लांट सात-आठ वर्षांत बदलावा लागतो. फेस लिफ्टचे उपाय पाच-सात वर्षांसाठी परिणामकारक असतात, तर बुटॉक्सचा प्रभाव सहा महिन्यांपुरताच असतो. इतर फिलर्सदेखील कालांतराने बदलावे लागतात.’’
अर्थात मेक टू ऑर्डरचे क्षणभंगुरत्व जरी असे अधोरेखित होत असले तरी त्याकडे लोकांचा ओढा मोठय़ा प्रमाणात आहे. तेव्हा साहजिकच काही प्रश्न मनात डोकावतात. शरीरावर असे उपचार करणे, त्याच्या घडणीत बदल करणे योग्य आहे का? त्याचा काही विपरीत परिणाम होतो का? हे करताना काही तत्त्वे पाळली जातात का?
त्यासाठी मेक टू ऑर्डर दोन प्रकारांत विभागावे लागेल. जशी मागणी तसा पुरवठा करणारे सर्जन हा एक महत्त्वाचा भाग झाला; पण शरीराची ठेवण वगैरे बाबींचा विचार न करता केवळ उपलब्ध आहे म्हणून मागायचे हे हॉटेलात जाऊन डोसा ऑर्डर करण्यासारखे आणि देण्यासारखे झाले. अर्थात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहेच. स्वत:च्या शरीराचे काय करायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या संदर्भात प्लास्टिक सर्जनना अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात. डॉ. थत्ते त्यावर सुंदर उदाहरण देतात. ‘‘एका छान दिसणाऱ्या मुलीला गालाला खळी करून हवी होती. त्या जागी माझी मुलगी असती तर मी हे करू दिले नसते. मग तिला मी पालकांशी बोलायला सांगितले, आठ दिवसांनी विचार करून पुन्हा यायला सांगितले. त्यानंतर जर ती आली तर मी कोण? मला जर हे करता येत असेल ते करणार; पण सुरुवातीला अवाजवी मागण्यांना नाकारायचे हे माझ्यापुरते पाळलेले तत्त्व आहे.’’
दुसरा मुद्दा आहे तो अशा प्रकारच्या सर्जरीच्या खर्चाचा. प्रसिद्धी माध्यमातून आणि अन्य जाहिरातींच्या माध्यमातून खर्चाचे वेगवेगळे आकडे ऐकायला मिळतात. त्यामुळे त्यावर अनेक तर्कवितर्क केले जातात; पण त्याआधी एक महत्त्वाची बाब ध्यानात घ्यावी लागेल. मुंबईत जसे १० रुपयांत जेवण मिळते तसे दहा हजारांतदेखील मिळते. स्थल, काल आणि व्यक्तिपरत्वे हा खर्च वेगळा असतो. त्यामुळे एखाद्या मध्यम प्रतीच्या हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डात ३५ हजारांत होणाऱ्या ऱ्हायनोप्लास्टीसाठी तारांकित हॉस्पिटलच्या डिलक्स रूममध्ये २.५ लाख लागू शकतात. अर्थात इम्प्लांट, बुटॉक्स, फिलर्सच्या किमती निर्धारित असतात, मात्र शस्त्रक्रियेच्या खर्चात फरक असू शकतो. त्यामुळे अमुक एक सर्जरी करण्यासाठी अमुक एक खर्च होतो असे आकडे माध्यमातून बाहेर जाणे हे सर्वार्थाने चुकीचे असल्याचे डॉ. थत्ते आवर्जून सांगतात. ‘‘समाजाची गरज जशी असेल तसे समाजाला मिळते. सोसायटी गेट द डॉक्टर इट डिझव्‍‌र्ह. त्यामुळे किमतीचा उल्लेख करून गोंधळ निर्माण करू नये.’’ तसेच आणखीन एक मूलभूत मुद्दा येथे विचारात घ्यावा लागेल, की एखाद्याने विनामूल्य शस्त्रक्रिया केली तरी तुमचे शरीर त्याच्या हातात देताना विचार कराल की नाही? त्यामुळे मेक टू ऑर्डरमधील शस्त्रक्रियांच्या किमतीच्या जाहिरातींना बळी पडू नये हे महत्त्वाचे.

गालाला खळी पाडून हवी, नाक असंच हवं, ओठ तसंच हवं असा आग्रह धरून केल्या जाणाऱ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या प्लॅस्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रिया म्हणजे एक प्रकारे मेक टू ऑर्डर. म्हणजे टेलरकडे जाऊन हवे तसे कपडे बेतून घेता येतात तसं आपलं शरीर बेतून घेणं. आपल्या समाजात वाढत असलेल्या या प्रकारची पाळमुळं कशात आहेत? त्यातले धोके काय आहेत?

आज मेक टू ऑर्डर भारतातील महानगरांमध्ये तर बऱ्यापैकी स्थिरावले आहे. तरीदेखील अनेकांना त्यांच्या त्याबद्दल बऱ्यावाईट शंका, धोके, प्रश्न सतावत असतात. त्यामुळेच मेक टू ऑर्डरमध्ये जिवाला धोका आहे का? हा एक सर्वसामान्य प्रश्न सर्वानाच पडतो. त्यावर डॉक्टर थत्ते सांगतात की, ‘‘जिवाला धोका कमी आहे, पण विद्रूप होण्याचा संभव आहे. बोटॉक्स वापरणे धोकादायक नाही, मात्र ते इंजेक्शन देण्याची जी पद्धती आहे ते अत्यंत कौशल्याचे काम आहे. त्यासाठी तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनच गरजेचा आहे. चुकून जरी चुकीचा स्नायू पॅरलाइज झाला तर गंभीर परिणाम होऊ शकतात. क्रो फीटसाठी इंजेक्शन देताना असा स्नायू चुकला तर सहा महिने डोळा उघडाच अथवा बंद राहण्याची शक्यता असते. तोच प्रकार फिलर्सच्या बाबतीत आहे. फिलर्सचा प्रभावदेखील फारफार तर एक वर्षांपर्यंत टिकतो आणि महत्त्वाचे म्हणजे हे काम तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनने करणे गरजेचे आहे.’’
पण आज अनेक वेळा सौंदर्यवृद्धीकरणाच्या नावाखाली यातील अनेक उपचार ब्युटी पार्लरमधूनदेखील केले जात असल्याचे आढळून येते. त्यावर डॉ. थत्ते सांगतात, ‘‘ब्युटी पार्लरबाबत सध्या तरी आपल्याकडे ठोस आकडेवारी नाही, पण तसे होत असेल तर गंभीर आहे. तज्ज्ञांच्या हातूनदेखील चूक होऊ शकते, पण ते प्रमाण हजारात एखादे आहे; पण जर अशा प्रकारे सर्रास बोटॉक्सचा वापर झाला तर तेच प्रमाण शंभरात एखाददेखील होऊ शकते. हाच प्रकार लायपो सक्शनबाबत आहे. त्याला प्रचंड मागणी आहे; पण लोकांच्या अपेक्षा अवास्तव असतात. चरबी काढून लोकांना एका महिन्यातच २० किलो वजन कमी करून हवे असते. असे करणे योग्य नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवाजवी अपेक्षा करणे. तुमच्या मागणीप्रमाणे नेमका काय बदल होऊ शकतो हे दाखविणारी सॉफ्टवेअर सध्या या क्षेत्रात उपलब्ध आहेत. पण त्यामध्ये दिसणारा बदल हा तुम्हाला खूपच सुंदर करून दाखवतो. तेवढे सुंदर प्लास्टिक सर्जनला करता येत नाही असे डॉ. थत्ते आवर्जून नमूद करतात. या विषयावर प्लास्टिक सर्जनांच्या परिषदांमध्ये घमासान चर्चा झाली आहे. सॉफ्टवेअर वापरावे पण त्याच्या मर्यादा, त्यातील त्रुटीदेखील सांगाव्यात, असे सांगितले गेले आहे. पण लोक नेमके आपल्याला सोईस्कर आणि हवे तेवढेच ऐकतात. त्यामुळे मग अपेक्षाभंग होतो.
म्हणूनच मेक टू ऑर्डरचा वापर करताना आपणास काय करायचे आहे याची सविस्तर व्यवस्थित चर्चा प्लास्टिक सर्जनबरोबर करायला हवी. त्यासाठी अवाजवी दबाव आणू नये आणि अवाजवी अपेक्षा धरू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सारे काही करणारा डॉक्टर तज्ज्ञ आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेक टू ऑर्डरची शस्त्रक्रिया करणारे केंद्र जर तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनचे नसेल तर हे सारे धोकादायक ठरू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ आवर्जून सांगतात.
आज आपल्या देशात सुमारे दोन हजारांच्या आसपास प्लास्टिक सर्जन आहेत. खंडप्राय देश म्हणून ही संख्या कमी आहेत, पण सध्या जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांच्या ठिकाणी प्लास्टिक सर्जन आहेत. जळणे, तुटणे वगैरेसाठी शस्त्रक्रिया करावयास ते पुरेसे आहेत. कोरिया जपानमध्ये ३५०० सर्जन आहेत. आपल्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. पण त्यांची अर्थव्यवस्था तशी आहे. त्यांच्याकडे मागणी अधिक आहे.
डॉ. मुकुंद थत्ते देशातील प्लास्टिक सर्जन असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत. देशातील प्लास्टिक सर्जन्सची नस त्यांना माहीत आहे. मग आपल्याकडील प्लास्टिक सर्जनचे भविष्य मेक टू ऑर्डर हेच आहे का? या प्रश्नावर ते सांगतात, ‘‘केवळ मेक टू ऑर्डर हे देशातील प्लास्टिक सर्जनचे भविष्य आहे असे थेट म्हणता येणार नाही. पण आपल्या समाजाचा ओढा बराच वाढलाय. त्यामुळे भविष्यात मागणी आहेच. नव्याने येणाऱ्या प्लास्टिक सर्जनकडे असणारी ८० टक्के मागणी ही या एस्थेटिक सर्जरीचीच आहे. त्यामुळे येत्या २० वर्षांत ही मागणी प्रचंड वाढणार आहे. हे लंबकासारखे आहे.’’
एक मात्र नक्की की मेक टू ऑर्डरचे मार्केट खूप विस्तारतेय. बोटॉक्सचे इंजेक्शन (दहा हजाराच्या आसपास), विविध फिलर्स, ब्रेस्ट इम्प्लांट (चाळीस-पन्नास हजार) अशी गरजेची उत्पादने तयार करणारे अनेक उद्योग विस्तारत स्थिरावत आहेत. त्यामुळे मागणी तसा पुरवठा आणि मागणीप्रमाणे किंमत असे सरळ सोपं बाजारपेठेचं गणित येथेदेखील लागू होणार आहे. किंबहुना हे सारेच क्षेत्र पुढील काळात मार्केट ड्रिव्हन झाले तर नवल वाटणार नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
असेच असेल तर मेक टू ऑर्डरचं भविष्य काय असेल याबाबत विचार करताना काही गोष्टी मात्र प्रकर्षांने मांडाव्या लागतात. त्यावर डॉ. थत्ते सांगतात, ‘‘बोटॉक्स हा टाइमपास आहे. दहा हजारचं एक इंजेक्शन, त्याचा प्रभाव सहा महिन्यांपुरताच मर्यादित. त्यामुळे त्याचे गणित हे आपल्या आर्थिक कुवतीशी निगडित राहणार, तर दुसरीकडे इम्प्लांट धंदाच जाणार आहे. रुग्णाची फॅट हा येणाऱ्या काळात मेक टू ऑर्डरमधील महत्त्वाचा घटक असणार आहे. यापुढील सर्वात मोठा वाव आहे तो म्हणजे फॅट इम्प्लांट. आज त्यावर बरेच प्रयोग सुरू आहेत. वीस वर्षांत इम्प्लांट धंदा निघून जाईल. फॅटच्या माध्यमातून स्वत:चाच टिश्यू मिळत असेल तर कोण बाहेरून टिश्यू घ्यायचा विचार करेल? आणि अर्थातच आधीच सांगितल्याप्रमाणे हे सारे लंबकाप्रमाणे आहे. कालांतराने लंबक दुसऱ्या बाजूला जाईलच.’’