12 December 2019

News Flash

तो राजहंस एक!

गोरक्षकर आणि म्युझियम असे अद्वैतच निर्माण झाले होते.

|| मीना गोडखिंडी

संग्रहालये सामान्यांना जगातील उत्तमोत्तम कलाकृतींशी ओळख करून देण्याचे, त्यांच्याविषयी रुची निर्माण करण्याचे आणि त्या कलाकृतींचे रसग्रहण करण्यासाठी सक्षम करण्याचे काम करतात. अशा संग्रहालयांसाठी कलाकृती मिळवणे, त्यांचे जतन करणे आणि त्यातून समाजप्रबोधन करणे यासाठी सदाशिव गोरक्षकर यांनी आयुष्यातील तब्बल ३२ वर्षे समर्पित केली. गोरक्षकर आणि म्युझियम असे अद्वैतच निर्माण झाले होते.

जगातील कोणत्याही संग्रहालय कलाकृतीकडे पाहताना, त्या कलाकृतीचे रसग्रहण करण्यासाठी रसिकांची मनोवृत्ती तयार करण्याचे, त्याबाबत आवड निर्माण करण्याचे काम संग्रहालये करतात. विविध कलाविष्काराच्या माध्यमांतून, त्या त्या काळाचा इतिहास, संस्कृती, मानवी आणि सामाजिक जडणघडण यांचे उकृष्ट दर्शन संग्रहालयातील कलाकृती पाहताना होते; पण असे संग्रहालय उभे करणे, कलाकृती जमविणे, त्याचे जतन करणे आणि त्यातून समाजप्रबोधन करणे हे काम सातत्यपूर्वक आणि चिकाटीने करावे लागते. असेच समर्पित जीवन असलेले ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’साठी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) ३२ वर्षे योगदान दिलेले आणि २२ वर्षे या संग्रहालयाचे संचालक म्हणून काम करणारे सदाशिव गोरक्षकर यांचे १३ जुलैला निधन झाले. संग्रहालय हेच कर्म मानून, त्यात कुशलता आणून कर्मयोग साधणारे सदाशिव गोरक्षकर आणि प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजे जणू अद्वैतच..!

आद्य मुंबईकर म्हणजे पाठारे प्रभू असलेले गोरक्षकर हे आजोबा आणि वडिलांनी घरात जमविलेल्या विविध कलाकृती पाहता पाहता घडत गेले. वैशिष्टय़पूर्ण वस्तूंची जपणूक करण्याचे ज्ञान त्यांना घरातूनच मिळाले. त्यामुळे साहजिकच इतिहासाची आवड निर्माण झाली आणि ती जोपासली प्रा. किणी यांनी; इतिहासाच्या सखोल अभ्यासाचा मंत्र जपत जपत. गोरक्षकरांनी सिद्धार्थ कॉलेजमधून इतिहास विषयात एमए केले. न्यू लॉ कॉलेजमधून त्यांनी १९६० मध्ये कायद्याची पदवी घेतली. पुढे याचा त्यांना खूप उपयोग झाला. आगळेवेगळे करिअर करण्याची इच्छा मनात होती म्हणून त्यांनी बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातून ‘म्युझिमोलॉजी’चा दोन वर्षांचा विशेष अभ्यास केला. संग्रहालय या विषयाशी निगडित सर्व गोष्टी त्यांना तिथे शिकता आल्या. नावीन्यपूर्ण वस्तू जमविणे. त्या जतन करताना स्वच्छतेची आणि त्या टिकाव्यात म्हणून विशेष काळजी कशी घ्यावी, त्या वस्तूंची मांडणी कशी करावी, संग्रहालये म्हणजे ‘पुराणवस्तू भांडार’ न करता संस्कृतीची जाण करून देणारे ‘समाजप्रबोधन केंद्र’ व्हावे याचे ज्ञान त्यांना मिळाले. संग्रहालय लोकाभिमुख कसे करायचे, शास्त्रीय, भौगोलिक, सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मांडणी करताना त्या त्या कालखंडाचा विचर कसा करायचा याचा गोरक्षकरांचा सखोल अभ्यास होता.

१९६४ ला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये संग्रहालयतज्ज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. आवडीचे काम करायला मिळालेल्या गोरक्षकरांनी या संधीचे सोने केले. या संग्रहालयात काम करताना त्यांनी ‘एज्युकेशन’ (शिक्षण), ‘कलेक्शन’ (संग्रह), ‘प्रेझेंटेशन’ (सादरीकरण) आणि ‘कम्युनिकेशन’ (सुसंवाद) यांचा सुरेख समन्वय साधला! महाराष्ट्रातील सर्वात मोठा वस्तुसंग्रह आपल्या संग्रहालयात असावा म्हणून त्यांनी अविरत कष्ट घेतले. त्यातील ‘पुरातत्त्व’ आणि ‘कला’ विभाग त्यांनी अत्यंत देखणेपणाने विकसित केले. डॉ. मोतीचंद यांच्या हाताखाली काम करताना गोरक्षकरांचे ज्ञान आणि अनुभवविश्व समृद्ध झाले. त्यांच्या या नि:स्पृह कार्याची दखल घेतली गेली आणि १९७० ला संग्रहालयाच्या संचालकपदी त्यांची नेमणूक झाली.

तब्बल २२ वर्षे संचालक म्हणून काम करताना त्यांनी अनेक दुर्मीळ वस्तू विकत घेतल्या. रतन टाटांकडून काही वस्तू भेटीदाखल मिळविल्या, तर काही अदलाबदल पद्धतीनुसार जमविल्या आणि सुरेख मांडणी करून त्यांनी हे संग्रहालय समृद्ध केले. एखाद्या वस्तूची सत्यता पटावी, त्यानंतरच ती अस्सल असल्याची खात्री पटल्यावरच संग्रहालयात तशा उल्लेखासहित ती मांडावी यासाठी त्यांनी सतत अभ्यास केला. जाणकारांच्या भेटी घेतल्या. या संदर्भात अमाप वाचन केले. १९२२ ला अकबराचे चिलखत या संग्रहालयात आले; पण ते अकबराचेच आहे हे समजायला १९८७ साल उजाडले. त्या चिलखतावरील कुराणाची वचने एका पर्शियन तज्ज्ञांकडून त्यांना समजली आणि त्यावरून हे चिलखत अकबराचेच आहे हे कळल्यावर गोरक्षकरांना अत्यानंद झाला. चिनी, जपानी आणि युरोपियन चित्रकला, नेपाळ, तिबेटमधील विविध मूर्ती, वस्त्रे, धातूंची भांडी. वेगवेगळ्या ठिकाणची आणि वेगवेगळ्या काळांतील ३० ते ३२ हजार नाणी, पेंढा भरलेले पशुपक्षी, अलंकार, वाद्ये, राजस्थानी जीवनशैली, कृष्णलीला दाखविणाऱ्या कलाकृती, हत्यारे, कोरीवकाम केलेले दरवाजे, खिडक्या, तावदाने, प्रभावळी, देवदेवतांच्या मूर्ती, शिलालेख, ताम्रपट या ठिकाणी इतर अनेक वस्तू त्यांनी संग्रहालयात जमविल्या. या सर्व वस्तूंची काळजी आणि स्वच्छता याकडे त्यांचे अगदी बारकाईने लक्ष असायचे! अशा या सुरेख वस्तुसंग्रहालयाला प्रिन्स चार्ल्स यांनी भेट दिली आणि त्यांनी ऋग्वेदातील पुरुषसुक्त म्हणून दाखविले त्या वेळी गोरक्षकर आणि उपस्थित अन्य कमालीचे अचंबित झाले.

गोरक्षकरांनी ‘पोटोला पॅलेस’, ‘हवेली महाराष्ट्र दर्शन’ इ. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन प्रदर्शने मांडली. या प्रदर्शनातून त्या त्या संस्कृतीविषयी त्यांनी समाजप्रबोधन केले. सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेतली आणि त्यांना परदेशात प्रदर्शन लावण्यासाठी प्रोत्साहन दिले. या संधीचा फायदा घेऊन गोरक्षकरांनी स्वीडन येथे ‘लावण्यदर्पण’, जपान येथे ‘मृग’, तर मॉरिशस येथे ‘नाविक’ या संकल्पनांवर आधारित सर्वागसुंदर प्रदर्शने मांडली आणि भारतीय संस्कृतीची प्रगल्भता पाश्चात्यांच्या निदर्शनास आणून दिली. अशी प्रदर्शने भारताबाहेर मांडणे हे अत्यंत जोखमीचे, काम त्यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली. ‘नाविक पंरपरा’ ही कायमस्वरुपी गॅलरी त्यांनी उभी केली. तिचे शानदार उद्घाटन राजीव गांधी यांनी केले होते. त्यावेळी राजीव गांधींनी गोरक्षकरांची, त्यांच्या कल्पकतेची भरभरून प्रशंसा केली. तसेच इंदिरा गांधी, तिबेटचे नेते दलाई लामा, वेगवेगळ्या क्षेत्रातील, नामांकित नामांकित परदेशी व्यक्ती, मान्यवर कलाकार इत्यादींनी या संग्रहालयास भेट देऊन तेथील कलात्मकतेला मनापासून दाद दिली.

कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही कलाकाराची, कोणतीही कलाकृती पाहताना त्या कलेतील अगर वस्तूमधील स्थायिभाव पाहणे गरजेचे असते असे गोरक्षकरांचे मत होते. संग्रहालायताील कला-मूल्यांची जपणूक, त्या कलाकृतींचे आगळेवेगळेपण आणि त्याचा आशय समाजापर्यंत नेण्याचा गोरक्षकरांनी सातत्याने प्रयत्न केला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या शतकमहोत्सवी प्रदर्शनात गोरक्षकरांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या १२५ व्या वर्षांनिमित्त गोरक्षकरांनी प्रदर्शन आणि संग्रहालयाची उभारणी केली. त्यामुळे अवघा इतिहासच जिवंत झाला. देवळालीच्या ‘चिलखती दलाचे’ प्रदर्शन गोरक्षकरांच्या राष्ट्रप्रेमाची प्रचीतीच देत होते. शिवाजी महाराज टर्मिनस वारसा जपण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीला कुशल गोरक्षकरांनी मार्गदर्शन केले आहे. स्वा. वीर सावरकर संग्रहालय म्हणजे गोरक्षकरांचा अभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. या पद्धतीने गोरक्षकरांनी देशभरातील अनेक वैशिष्टय़पूर्ण संग्रहालये आणि  प्रदर्शने साकारली.

धातुशास्त्राचा त्यांचा विशेष अभ्यास असल्यामुळे त्यांनी या संदर्भात अभ्यासपूर्ण लेखनही केले. ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम’ आणि ‘कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ म्युझियम’चे पहिले आशियाई अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यामुळे आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली! त्यांच्या या ‘बहुआयामी’ कार्याची दखल भारत सरकारने घेतली. २६ जानेवारी २००३ रोजी त्यांना ‘पद्मश्री’ हा मानाचा सन्मान मिळाला. २०१६ साली त्यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. विविध संस्थांचे लहानमोठे पुरस्कार त्यांना मिळालेच; पण रसिकांच्या मनातील प्रेमाचा, जिव्हाळ्याचा पुरस्कार लाखमोलाचा आहे असे ते समजत..!

त्यांचा स्वभाव अत्यंत ऋ जू आणि विनम्र होता. एखाद्या कार्यक्रमाला येऊन ते तिथे  सहजपणे मिसळून जात. एकदा गोरक्षकरांच्या घरी जाण्याचा योग आला. घरी गेल्यावर तर छोटय़ा संग्रहालयात प्रवेश केल्याचा सुंदर अनुभव आला. घराच्या मागच्या बाजूस झुळझुळणारी नदी, भरपूर झाडे, इवले इवले छोटे पक्षी पाहून निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या कर्मयोगी गोरक्षकरांबद्दलचा आदर अधिकच द्विगुणित झाला.

सदाशिव गोरक्षकरांविषयी म्हणावेसे वाटते,

‘देखणी ती जीवने, जी तृप्तीची तिथरेदके।

चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे।’

 

response.lokprabha@expressindia.com

First Published on August 1, 2019 2:39 pm

Web Title: prince of wales museum chhatrapati shivaji maharaj vastu sangrahalaya mpg 94
Just Now!
X