१९९१ मध्ये भारतात आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या दिशा खुल्या करून देशाचे भाग्य उजळविणारे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाचे कर्तेकरविते आणि नरसिंह राव यांचे त्यावेळचे उजवे हात असलेले अर्थमंत्री (आणि पुढे पंतप्रधान झालेले ) डॉ. मनमोहन सिंग यांनी या द्रष्टय़ा नेत्याच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला  मनोज्ञ वेध..

अर्थकारणाला पूर्ण नवी दिशा देऊन देशाचे भविष्य बदलण्याचे सामथ्र्य माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे होते. ‘द्रष्टे नेतृत्व’ असे त्यांचे वर्णन करणे योग्य ठरेल.

pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका
PM Narendra Modi
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित
Fali S Nariman passed away
भोपाळ गॅस प्रकरणापासून ‘या’ ऐतिहासिक निकालांमध्ये नरिमन यांचा सहभाग होता निर्णायक
Kamal nath to joiN bjp
कमलनाथ भाजपाच्या वाटेवर, पण १९८४ च्या दंगलीमुळे अडचण; वाचा ४० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

१९९१ मध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून मला काम करण्याचा अनुभव मिळाला. पण त्यांची माझी ओळख त्याही आधीची. मी स्वित्र्झलडमध्ये जीनिव्हामध्ये होतो. तिथे साऊथ कमिशनचा महासचिव म्हणून मी काम करत होतो. (शीतयुद्धानंतरच्या काळात दक्षिणेतील विकसनशील देशांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि त्या देशांना विकास धोरणांसाठी शिफारशी करणे, या उद्देशाने साऊथ कमिशनची निर्मिती झाली होती. १९८७ ते ९० अशी तीन वर्षे हे कमिशन कार्यरत होते. त्यानंतर त्याचे ‘साऊथ सेंटर’ या संघटनेत रूपांतर करण्यात आले.) १९८८-८९ याच काळात नरसिंह राव भारताचे परराष्ट्रमंत्री होते. ते जीनिव्हाला येत तेव्हा त्यांची गाठभेट होत असे. त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पाही होत असत.

२१ जून १९९१ रोजी नरसिंह राव यांच्या केंद्रातील सरकारचा शपथविधी झाला. त्या दिवशी नरसिंह राव यांनी मला बोलावून घेतले. ‘‘माझ्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून तुम्हाला काम करायला आवडेल का?’’ असा थेट प्रश्न त्यांनी मला केला. हा प्रश्न माझ्यासह इतर सर्वासाठीच अनपेक्षित होता. मी राष्ट्रपती भवनावर गेलो. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली. ही जबाबदारी मोठी होती. मनात थोडी धाकधुकही होती. त्यामुळे अधिकृतपणे होकार देण्याआधी मी नरसिंह राव यांना मोकळेपणाने माझ्या अपेक्षा सांगितल्या. ‘‘मला माझ्या कामात पूर्ण मोकळीक मिळणार असेल तरच मी मंत्रीपद स्वीकारेन..’’ मी नरसिंह राव यांना सांगून टाकले. त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि काहीसे  हसून गमतीच्या स्वरात म्हणाले, ‘‘तुम्हाला संपूर्ण मोकळीक असेल. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. त्याबाबतीत तुम्ही निर्धास्त राहा. आपण जी आर्थिक धोरणे राबवणार आहोत ती यशस्वी झाली तर त्याचे श्रेय आपण सगळेच घेऊ. पण अपयश आले तर तुम्हाला अर्थमंत्रीपद सोडून जावे लागेल..’’

केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. नरसिंह राव पंतप्रधान झाले. मी अर्थमंत्री झालो. त्यानंतर नरसिंह राव यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली. नरसिंह राव यांनी मला सांगितले की, या नेत्यांना आपण काय करणार आहोत ते समजावून सांगा. देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी काय करावे लागणार आहे, देशाचे नवे आर्थिक धोरण काय असेल याची सविस्तर माहिती मी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिली. पंतप्रधानांनी मला आर्थिक सुधारणा करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. या बैठकीत विरोधी पक्षांचे नेते अचंबित झाले होते असे मला जाणवत राहिले.

देशात ९० च्या दशकात झालेल्या आर्थिक सुधारणा या काही अचानक झालेल्या नाहीत. हा ऐतिहासिक बदल होता. असे बदल होण्यासाठी राजकीय दूरदृष्टी लागते. राजकीय नेतृत्वाकडे ती असेल तर ऐतिहासिक बदलांची शक्यता निर्माण होते. आर्थिक धोरणांची दिशा बदलली पाहिजे, हे पहिल्यांदा जाणले ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. सामाजिक न्यायाकडे दुर्लक्ष न करता आर्थिक विकासाला गती द्यायला हवी, हे इंदिरा गांधी यांच्या लक्षात आले. त्यांचा वारसा राजीव गांधी यांनी पुढे चालवला असे म्हणता येईल. राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा नव्या माहिती युगाची चाहूल लागलेली होती. या माहितीचे महत्त्व अर्थकारणात काय असू शकते याची नीट कल्पना राजीव गांधी यांना होती. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आर्थिक सुधारणांची दिशा माहिती युगाच्या परिप्रेक्ष्यात केली गेली. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने हे बदल घडवून आणले.

त्यानंतर र्सवकष आर्थिक बदलांचे नरसिंह राव सूत्रधार बनले. ज्या धाडसीपणाने त्यांनी आर्थिक सुधारणांना गती दिली, त्याबद्दल त्यांना अभिवादन केलेच पाहिजे. १९९१ मध्ये नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आणि माझ्या अर्थमंत्रीपदाच्या जबाबदारीत आर्थिक सुधारणा हाती घेण्यात आल्या. (बंदिस्त अर्थव्यवस्थेकडून अर्थकारणाचा प्रवास खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाकडे सुरू झाला.) या सुधारणा करत असताना एकाच वेळी दोन स्तरावर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले गेले. आर्थिक धोरण व परराष्ट्र नीती. दोन्हीचा समन्वय साधत या आर्थिक सुधारणा केल्या गेल्या. पण हे करत असताना कुठल्याही विशिष्ट चौकटीत ही धोरणे सीमित केली गेली नव्हती. भारताच्या दृष्टीने काय उपयुक्त ठरू शकेल याचा विचार करूनच आर्थिक धोरणे ठरवली गेली.

भारताने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम कसा राबवला पाहिजे, या मुद्दय़ावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक मायकल कॅमडिसस यांच्याशी नरसिंह राव यांच्या झालेल्या चर्चा मला आठवतात. (नाणेनिधीने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवण्याच्या अटीवर भारताला कर्ज देऊ केले होते.) नरसिंह राव कॅमडिसस यांना म्हणाले होते, ‘‘भारत हा लोकशाही देश आहे. इथे रोजगारक्षम लोकांच्या हितांचे रक्षण झाले पाहिजे. त्यांचा विचार न करता आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवता येणार नाही. भारताचे हित लक्षात घेऊनच त्या केल्या जातील..’’

आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला ठामपणे सांगितले होते की, आर्थिक क्षेत्रातील संरचनात्मक सुधारणा करताना सार्वजनिक क्षेत्रातील एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाता कामा नये. सुधारणांच्या बदल्यात नोकरकपातीला आम्ही परवानगी देणार नाही. देशाचे प्राधान्यक्रम काय आहेत हे लक्षात घेऊनच आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला गेला. देशाला दिलेले वचन आम्ही पाळले असे मला वाटते.

एका बाजूला आर्थिक बदलांना गती देत असताना नरसिंह राव यांनी परराष्ट्र धोरणातही वास्तवदर्शी बदल केले. शेजारी राष्ट्रांशी संबंध दृढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचाच भाग म्हणून १९९३ मध्ये नरसिंह राव यांनी चीनला भेट दिली. भारत-चीन संबंधांतील कडवटपणा कमी करण्यासाठी त्यांचा चीन दौरा महत्त्वाचा होता. नरसिंह राव यांच्याच कारकीर्दीत ‘सार्क’ देशांमध्ये दक्षिण आशियाई देशांशी अग्रणी व्यापार करार केला गेला. ‘पूर्वेकडे बघा’ हे धोरण त्यांच्या काळातलेच. आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने पूर्वेकडील तसेच दक्षिण-पूर्वेकडील देशांशी संबंध वाढवणे व ते दृढ करणे या परराष्ट्र व आर्थिक धोरणाचा पाया नरसिंह राव यांच्याच कारकीर्दीत घातला गेला.

त्यांच्या काळात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. उपग्रह प्रक्षेपक वाहन व धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहनाद्वारे अंतराळात उपग्रह यशस्वीरीत्या पाठवले गेले. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा होता. १९९४ मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर क्षेपणास्त्र विकासाचे पुढील टप्पे पार केले गेले.

नरसिंह राव हे अनेक अर्थाने माझे मित्र व मार्गदर्शक होते. मी त्यांना खूप जवळून पाहिले आहे. ते राजकीय क्षेत्रात वावरत असूनसुद्धा एखाद्या संन्याशासारखे होते. त्यांना भारतीय परंपरा, मूल्ये यांचे नेमके भान होते. त्यांची कास न सोडता त्यांनी आधुनिकतेची वाट धरली होती. ते विद्वान होते, मुत्सद्दी होते. त्यांनी केवळ देशाच्या अर्थकारणालाच नवी दिशा दिली असे नाही, तर परराष्ट्र नीतीलाही नवे वळण दिले. ते भाषापंडित होते. ते अनेक भाषा अस्खलित बोलत असत. त्या भाषा त्यांना उत्तम ज्ञात होत्या. त्यामुळेच कदाचित ते भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले तरी तिथल्या लोकांशी त्यांच्याच भाषेत आपलेपणाने संवाद साधू शकत असत. करीमनगर असो, पुणे असो, बनारस असो, नाहीतर दिल्ली..

नरसिंह राव यांचे द्रष्टे नेतृत्व भारताला लाभले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांना अभिवादन.