दहशतवादी एका विशिष्ट धर्माचेच असतात आणि त्याबद्दल धर्मनिरपेक्ष नेते मूग गिळून बसले आहेत आणि हेच बेगडी धर्मनिरपेक्षतेचे उत्तम उदाहरण आहे, असे वक्तव्य करून भाजपचे नेते गिरिराज सिंग यांनी बुधवारी एका नव्या वादाला तोंड फोडले. गिरिराज सिंग यांच्या वक्तव्यावर विविध राजकीय पक्षांनी जोरदार हल्ला चढविला आहे.
दहशतवादाचा प्रश्न देशाशी संबंधित आहे, एका विशिष्ट समाजाशी संबंधित नाही. दहशतवादाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्ती एकाच समाजातील असतानाही धर्मनिरपेक्ष नेते मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा सवाल गिरिराज सिंग यांनी केला.
ज्या दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे ते एकाच समाजातील आहेत ही बाब खरी आहे ना, असा सवाल गिरिराज सिंग यांनी केला. त्या समाजातील सर्व लोक दहशतवादी आहेत, असे आपले म्हणणे नाही, मात्र ज्यांना पकडण्यात आले आहे ते एकाच समाजातील आहेत आणि हीच मानसिकता देशासमोर धोका निर्माण करीत आहे, असेही ते म्हणाले.