जळगाव
पक्षाचे तीन आणि एक समर्थक असे चार आमदार पाठीशी असतानाही जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या हृदयाची धकधक कमी होण्याऐवजी उलट वाढतच असून नेमकी अशीच स्थिती मतदारसंघात पक्षाचा एकही आमदार नसल्याने भाजपचे उमेदवार खा. ए. टी. पाटील यांची आहे. आघाडीचे डॉ. पाटील यांच्या तंबुत वरवर सर्वकाही सुरळीत असल्याचे दिसत असले तरी दगाफटक्याच्या भीतीने ते त्रस्त आहेत. तर, खा. पाटील यांना महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेच्या प्रयत्नांवर आणि मोदी लाटेवर अवलंबून राहावे लागत आहे.
जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यामुळे शिवसेनेचे सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे गुलाब देवकर असे दोन आमदार सध्या तुरूंगात असलेल्या या लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे या मतदारसंघात तीन तर अमळनेरचे एक समर्थक अशा चार आमदारांचे डॉ. पाटील यांच्यामागे बळ आहे. मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असल्याने आघाडी आणि महायुती दोघांनीही या समाजाला प्राधान्य दिले आहे. भाजपमध्ये प्रवेश करून मागील निवडणुकीत विजय मिळविणारे ए. टी. पाटील यांनी सलग दुसऱ्या विजयासाठी कंबर कसली असली तरी भाजपने आतापर्यंत ज्यांना फारसे जवळ केले नाही. त्या शिवसैनिकांवरच त्यांची प्रचार यंत्रणा अवलंबून आहे.  दुसरीकडे मतदारसंघावर वरवर वर्चस्व दिसत असले तरी ‘बडा घर पोकळ वासा’ अशी  राष्ट्रवादीची स्थिती आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी कान टोचल्याने राष्ट्रवादीचे आमदार एकत्र आल्याचे दिसत असले तरी  यावेळची परिस्थिती वेगळी आहे. उमेदवार भाजपचा आणि कार्यकर्ते शिवसेनेचे असे दिसत आहे. पाच वर्षांत विद्यमान खासदारांनी कोणते काम केले, हा प्रश्न आघाडीकडून उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर महायुतीकडे नसल्याने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागण्यात येत आहे. जळगाव शहरावर आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीचे वर्चस्व असल्याने आघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी सतीश पाटील यांनी आ. जैन यांची भेट घेतली होती. ही भेट राजकीय नव्हती असा दावा पाटील यांनी तेव्हां केला होता. परंतु खान्देश विकास आघाडीने अलीकडेच सतीश पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांची ती भेट कशासाठी होती हे स्पष्ट होते. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे उमेदवार असल्याने त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर जिंकण्यासाठी जबाबदारी सोपवली आहे. जळगाव पर्यटनदृष्टय़ा सुयोग्य करण्यासाठी आणि नवनवीन उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. केळी आणि कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग वाढविणार.  
    -डॉ. सतीश पाटील (आघाडी)

जळगाव जिल्ह्यात सिंचन हा एक महत्वपूर्ण प्रश्न असून सिंचनाखाली अधिकाधिक शेती यावी याकडे लक्ष देऊ. वाढती महागाई आणि महिलांची असुरक्षितता या विषयांच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांविरोधात असलेला असंतोष मतपेटीतून बाहेर पडेल.
    -खा. ए. टी. पाटील (महायुती)

माझी उमेदवारी सर्वासाठी नवीन असली तरी माझे काम लोकांना ठाऊक आहे. तीच माझी ताकद आहे. आम आदमी पक्ष सतत जनतेचे प्रश्न मांडत आला असून यापुढेही पक्ष असेच कार्य करत राहील. मतदारांनी मला संधी दिल्यास  निश्चितच भरीव विकास कामे करून दाखवू.
    -डॉ. संग्राम पाटील ( आप)