बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणजे नरेंद्र मोदी यांचे आद्य आणि कट्टर विरोधक. मोदींची भाजपने पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार म्हणून निवड केली तेव्हा पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला तो बिहारमध्येच. तेथील सरकारमधून पक्षाला बाहेर पडावे लागले. नितीशकुमार यांचा मोदींविरोधातील ताठरपणा वाढत गेला. दुसरीकडे मोदी आणि भाजपनेही बिहारमध्ये दंड थोपटले. मोदी-नितीशकुमार यांच्यातील संघर्षांचा कस बिहारमध्ये येत्या निवडणुकीत लागेल.
लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडीही लढतीत आहे. तिचा, विशेषत: लालूंचा प्रभाव दुर्लक्षण्याजोगा नाहीच. ‘जब तक जंगल में है भालू..’ हे लालूवचन धुडकावता येणार नाही. त्यांची काही प्रभावक्षेत्रे, मतपेढी आहे. मात्र सर्व राज्याला आपल्या मागे खेचून घेईल एवढा लालूप्रभाव आता राहिलेला नाही. मुलगी, पत्नी यांना उमेदवारी दिल्याने राजदतील पक्षांतर्गत धुसफुस बाहेर आली. काँग्रेसची या महत्त्वाच्या राज्यातील परवड मागील पानावरून पुढे चालू आहे. भाजपला पहिला निवडणूकपूर्व मित्रपक्षही बिहारमधूनच मिळाला. रामविलास पासवान यांनी त्यांचा मोदी विरोध संपुष्टात आणून त्यांचा लोकजनशक्ती पक्ष भाजपच्या वळचणीला आणला. मोदींसाठी ही दिलाशाची बाब ठरली. राज्याच्या उद्योगमंत्री रेणू कुशवाह तसेच लालूंचे एकेकाळचे विश्वासू रामकृपाल यादव हेही नुकतेच पक्षात दाखल झाले. रामकृपाल हे लालूकन्या मिसा भारती यांच्याविरोधात पाटलीपुत्रमधून लढतील.
बिहारमधील निवडणुकांचे विश्लेषण नेहमी जातीपातीची गणिते आणि मुस्लीम मतांचा कल याआधारे केले जाते. लालूंचे येथील राजकारण ‘माय पॉलिटिक्स’ (मुस्लीम अधिक यादव ) म्हणून ओळखले जाते. या राजकारणाला नितीशकुमार यांनी यशस्वीपणे तडा दिला. एकीकडे त्यांनी मागास, अतिमागास जातींची मोट बांधली. दुसरीकडे त्यांनी भाजपशी मैत्री करून सवर्ण जातींची मतेही स्वत:कडे वळविली. त्यांच्या सरकारच्या चांगल्या प्रशासकीय कामगिरीमुळे मुस्लिमांनाही त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला. आता भाजपने सत्ताधारी संयुक्त जनता दलापासून फारकत घेतल्याने या मांडणीत फेरफार अपेक्षित आहेत. जी आघाडी वा पक्ष राजकीय उद्दिष्टांसाठीची सामाजिक मांडणी परिणामकारकतेने करेल त्याला राज्यात यश मिळेल. यामुळे राज्यातील तिन्ही प्रमुख राजकीय घटकांना नव्याने डावपेच आखावे लागतील. लालूंना त्यांच्या मतपेढीची चाचपणी करावी लागेल. यादव मते भाजप वा जनता दलाकडेही वळण्याचा धोका त्यांच्यासमोर आहे. मुस्लीम मतदार आपल्याबरोबर पूर्वीएवढय़ा विश्वासाने राहिलेली नाहीत याची खूणगाठ त्यांनी बांधली असेलच. स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी लालूप्रसाद निकराने झुंजतील अशी चिन्हे आहेत.
नितीशकुमार यांनी मोदी यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढायचे तंत्र अवलंबले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या काळातील बिहारच्या विकासाचा नगाराही ते जोरजोराने वाजवत आहेत. सुशासनात आपण गुजरातच्या मागे नाही, असा त्यांचा दावा आहे. तो राज्यातील मतदार किती मान्य करतात, हे निवडणुकीत दिसेल. याचबरोबर नितीशकुमार यांनी जातीपातीची गणिते अनुकूल ठरण्यासाठीही पावले उचलली आहेत. गिरी या ब्राह्मण जातीचा त्यांनी नुकताच इतर मागासवर्गात समावेश केला. इतरही काही जातींबाबत त्यांनी अशीच पावले उचलली. विकास, धर्मनिरपेक्षता यापेक्षाही ‘सोशल इंजिनीअिरग’ महत्त्वाचे आहे, हे ते जाणून आहेत. भाजपची गेलेली मतपेढी ते कशी भरून काढतात, हा राजकीय औत्सुक्याचा मुद्दा ठरेल. राज्यातील लोकसभेच्या ४० जागांपैकी त्यांनी गेल्या वेळेस भाजपच्या साथीने २० जागा जिंकल्या होत्या. या कामगिरीची पुनरावृत्ती त्यांना करावी लागेल.
नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी उत्तर प्रदेशखालोखाल बिहार हे महत्त्वाचे राज्य आहे. गेल्या वेळी पक्षाला १२ जागांवर विजय मिळाला होता. या जागा वाढण्याची अपेक्षा पक्ष बाळगून आहे. नितीशकुमार यांना वेसण घालण्यासाठीही येथील विजय पक्षासाठी निर्णायक ठरेल. यामुळेच डावपेच आणि साधनसामग्री यांच्या पूर्ण तयारीने भाजप लोकजनशक्ती पक्षाशी आघाडी करून लढतीत उतरला आहे. बिहारमधील लढत लक्षवेधक होणार हे निश्चित.

पाटलीपुत्रबाबत उत्सुकता
रामकृपाल यादव हेही नुकतेच भारतीय जनता पक्षात दाखल झाले. रामकृपाल हे लालूकन्या मिसा भारती यांच्याविरोधात पाटलीपुत्रमधून लढतील.  रामकृपाल हे लालूंचे अत्यंत विश्वासू सहकारी. गेली दोन दशके त्यांच्या बरोबर राहिलेले. मात्र, आता कन्याप्रेमाच्या निषेधार्थ त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. यामुळे पाटलीपुत्रची लढत लक्षवेधक ठरेल.