* जिवाणू संवर्धक – बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धक आणि पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद दिल्यास उत्पादनात ४५ टक्के वाढ झाल्याचे आढळले. पूर्व विदर्भातही उन्हाळी हंगामातदेखील रायझोबियम जिवाणू संवर्धक लावल्यास उत्तम प्रतिसाद दिसून आला.
* बीजप्रक्रिया – मूग या पिकास रोपावस्थेत मूळकुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगापासून होणारे नुकसान टाळण्याकरिता पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम किंवा बाविस्टीन यापैकी एका बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
* रासायनिक खते – हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते.
* सुधारित जाती – महाराष्ट्रात जळगाव ७८१ व कोपरगाव हे जुने वाण बऱ्याच वर्षांपासून खरीप लागवडीखाली आहेत. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला व भा.प.अ. ट्रॉम्बे यांच्या संयुक्त प्रयत्नाद्वारे टी.ए पी-७ हा वाण प्रसारित करण्यात आला. या वाणाचे उत्पादन कोपरगाव पेक्षा २४ टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे हा वाण भुरी रोगाससुद्धा इतर वाणांच्या मानाने कमी प्रमाणात बळी पडतो. रबी लागवडीच्या क्षेत्रातसुद्धा या वाणांचा प्रसार करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून खरीप हंगामाकरिता फुले मूग-२ हा वाण पश्चिम महाराष्ट्राकरिता प्रसारित करण्यात आला. उन्हाळी मूगाकरिता एस-८ आणि पुसा वैशाखी हे वाण प्रचलित आहेत.