महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे नवे २७०१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये ८१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. एवढंच नाही पूर्वीच्या १३२८ मृत्यूंची नोंदही आजच करण्यात आली आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ही १ लाख १३ हजार ४४५ झाली आहे. यापैकी ५७ हजार ८५१ रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. मागील २४ तासांमध्ये १८०२ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ५० हजार ४४ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ५०.९९ टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा ४.८ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ८६ हजार ६८६ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

महाराष्ट्रात कोविड १९ मृत्यू निश्चित करताना जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था, राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्था या शिखर संस्थांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येते. मागील २४ तासांमध्ये करोनाची बाधा होऊन राज्यात ८१ जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईतील ८३२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा १३२८ नव्या मृत्यूंचीही नोंद घेण्यात आली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खासगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोविड १९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ६ लाख ८४ हजार नमुन्यांपैकी १ लाख १३ हजार ४४५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.