हर्षद कशाळकर,लोकसत्ता
अलिबाग : राज्यात सध्या करोनाचा सर्वाधिक संक्रमण दर रायगड जिल्ह्य़ात आहे. त्यामुळे चाचण्या वाढवणे आणि करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे यावर भर देणे गरजेचे आहे.
साप्ताहिक करोनाबाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची संख्या लक्षात घेऊन पाच स्तरांत निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. यात रायगड जिल्ह्य़ाचा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्य़ात सध्या ६ हजार ६७६ उपचाराधीन रुग्ण आहेत. यात प्रामुख्याने अलिबागमधील १ हजार २२७, पनवेल मनपा हद्दीतील १ हजार १८४, रोहा येथील ७७३, पनवेल ग्रामीणमधील ६९७, पेणमधील ६६५, उरण ३४३, खालापूर ३३१, माणगाव २८५, महाड २०१, मुरुड २५९, श्रीवर्धन १८२, कर्जत १५५ रुग्णांचा समावेश आहे. अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड, मुरुड येथील रुग्णवाढ चिंताजनक आहे.
पनवेल मनपा आणि पनवेल ग्रामीणमधील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी उर्वरित रायगड जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. उलट काही तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा रुग्णवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. २५ मे ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्य़ात ३२ हजार ५०६ चाचण्या करण्यात आल्या व त्यात ४ हजार ८८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आठवडय़ाभरात १४६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. या आठवडय़ात रुग्णवाढीचा दर हा १४.२८ टक्के होता. राज्यातील इतर कुठल्याही जिल्ह्याच्या तुलनेत हा दर अधिक आहे. याआधीच्या आठवडय़ात रुग्णवाढीचा दर हा १८ टक्क्यांवर होता. ही बाब लक्षात घेतली तर जिल्ह्य़ातील करोनाचा प्रादुर्भाव अजूनही आटोक्यात येत असल्याचे दिसून येत नाही.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रायगड जिल्ह्य़ात येऊन करोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्य़ात लोकसंख्येच्या तुलनेत करोना चाचण्यांचे प्रमाण हे खूपच कमी असल्याचे निरीक्षण त्यांनी या वेळी नोंदवले.
विशेषत: ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरही भर देण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले. त्यामुळे रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
राज्याच्या तुलनेत जिल्ह्य़ात पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही लाटेत हाच कल दिसून आला होता. यामागची कारणे अनेक आहेत. बऱ्याचदा खासगी तपासणी केंद्रांवरील नकारात्मक आलेल्या चाचण्यांचे रिपोर्ट कळविण्यास उशीर होतो. त्यामुळे चाचण्या होऊनही त्यांची नोंद होत नाही. करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे या दोन पातळ्यांवर आपल्याला काम करावे लागले.
– डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवे..
करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर देणे, करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे, संस्थात्मक विलगीकरण करून रुग्णांवर उपचार करणे आणि करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
रुग्णवाढ आटोक्यात न येण्यामागची कारणे
जिल्ह्य़ात करोनाविषयक निर्बंधांचे फारसे पालन केले गेले नाही. प्रशासकीय यंत्रणांनी टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. लग्न समारंभांतील होणारी गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. आंतरजिल्हा वाहतुकीवर निर्बंध असताना, जलप्रवासी वाहतूक निर्धोक सुरू होती. ग्रामीण भागात अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरूच होती. बाजारपेठांमधील गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न झालेच नाहीत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईकडे यंत्रणांनी दुर्लक्ष केले. कामगार नाक्यांवरील गर्दी रोखण्याचाही प्रयत्न झाला नाही. करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला गेला नाही. करोनाबाधितांवर गृह विलगीकरणात उपचार करण्यावर भर दिला गेला. संस्थात्मक विलगीकरणाकडे दुर्लक्ष केले. इतर जिल्ह्य़ांतून येणाऱ्या पर्यटकांना थोपविण्याकडेही दुर्लक्ष केले गेले. या सर्व कारणांमुळे जिल्ह्य़ातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकलेला नाही.