भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात माझे नाव नाहक गोवण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. अगदी यमाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली तरीही मी चौकशीलाही सामोरे जायला तयार आहे अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे गुरुजींनी पत्रकारांना दिली.

हातातून सत्ता गेलेल्यांच्या मनात कौरवनिती शिरली आहे त्याच नीतीतून माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. भिडे गुरुजींच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या ठिकाणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचमुळे या रविवारी होणारे भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला परवानगीही नाकारण्यात आली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर भिडे गुरुजींनी आज प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. ते सांगली येथे पत्रकारांशी बोलत होते.

मी गेल्या अडीच ते तीन वर्षात त्या भागात फिरकलोही नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. संभाजी महाराजांची समाधी हे आमचे श्रद्धास्थान आहे. तरीही मी त्या भागात गेलो नव्हतो. माझ्याविरोधात पोलिसात तक्रार केलीये त्यात असे नमूद करण्यात आली ज्यात मी भिडे गुरुजींना दगड मारताना पाहिले असे म्हटले आहे. हा आरोपही दुर्दैवी आहे. हिंसाचार उसळला त्या ठिकाणी कॅमेरे असतील त्यांचे फुटेज काढून पाहा मी त्या ठिकाणी नव्हतोच असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगलीत ते पत्रकारांशी बोलत होते.

अॅट्रॉसिटी असावी की नसावी ते मला समजत नाही मात्र या कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो आहे असेही मत भिडे यांनी मांडले. तसेच भीमा कोरेगाव हिंसाचार  प्रकरणाचा शोध अगदी मूळाशी जाऊन घ्यावा अशी मागणी मी करतो आहे. ‘भिडे गुरुजींचे व्याख्यान झाले त्यानंतर हिंसाचार उसळला’ हा आरोप तर न जन्मलेल्या पोराच्या बारशाची तयारी करण्यासारखा आहे. मी भाषण केले नाही, चिथावणी देण्याचा प्रश्नच नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.

या सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे. माझे, एकबोटेंचे आणि घुगेंचे नाव कोणी घेतले याचाही शोध प्रशासनाने घ्यावा अशीही मागणी भिडे गुरुजींनी केली. भिडे गुरुजींच्या भाषणामुळे दंगल झाली या आरोपाला काहीही अर्थ नाही. माझ्याविरोधात रचलेला हा पूर्वनियोजित कट आहे असाही आरोप त्यांनी केला.

ज्यांना खेटरापाशी उभे करू नये ते लोक प्रमुख असतात अशी अनेक उदाहरणे राजकारणात बघायला मिळतात. त्यामुळे अशाच लोकांनी इतरांच्या भावना भडकावण्याचे काम केले आहे असाही आरोप त्यांनी केला. तसेच प्रकाश आंबेडकरांना आमची नावे कोणी सांगितली? त्याचीची माहिती मिळालीच पाहिजे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली.