कोकण रेल्वेने शिल्पकार कै. प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र सावंतवाडी रोडवर पुन्हा सन्मानाने काँग्रेसने खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते लावले. हे तैलचित्र कोकण रेल्वेने काढल्यास कोकण रेल्वे थांबेल, लोक रस्त्यावर येतील, असा इशारा खासदार राणे यांनी दिला.
सावंतवाडी रोड स्थानकावर प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र बॅ. नाथ पै प्रतिष्ठानने लावले होते. ते काढण्याचा आदेश कोकण रेल्वेचे मॅनेजिंग डायरेक्टर भानुप्रकाश तायल यांनी दिला होता. त्यानंतर पुन्हा आज सन्मानाने काँग्रेसने तैलचित्र लावले. तेव्हा खासदार राणे यांनी तायल यांना फटकारत त्यांनी बदली करून घ्यावी, असा इशारा दिला.
कै. प्रा. मधु दंडवते यांच्या संसदेतील कामकाजाचा अभ्यास गेली तीन वर्षे मी करत आहे. त्यांच्या भाषणांच्या अभ्यासावरूनच मी संसदेत काम करत आहे. त्यांच्या बद्दल मला आदर असून ते माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते, असे खासदार राणे म्हणाले.
कोकणच्या प्रश्नांची माहिती नसल्यानेच कोकण रेल्वे कोकणचा विकास करू शकली नाही. मॅनेजिंग डायरेक्टर भानुप्रकाश तायल यांना फटकारत ते विकासाच्या आड येत असल्याचा खासदारांनी आरोप केला.
प्रा. दंडवते हे जनता दलाचे होते तर मी काँग्रेसचा आहे, म्हणून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करत आहे. त्यासाठीच त्यांचे तैलचित्र पुन्हा हटविले गेल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, रेल्वे थांबेल असा इशारा खासदार राणे यांनी दिला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राजन तेली, सतीश सावंत, वसंत केसरकर, विकास सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.