विदर्भात तापमान वाढीमुळे तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाचव्या दिवसापर्यंत विदर्भातलं तापमान हे खाली येईल असा अंदाज आहे. छत्तीसगढमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्यप्रदेशातल्या पूर्व भागात २ दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाचे अधिकारी एम एल साहू यांनी ही माहिती ANI शी बोलताना दिली.

गेल्या काही वर्षांत ऋतुचक्र  पूर्णपणे पालटले आहे. यावर्षीही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन वर्षभरच सुरू आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होऊनही तापमानात वाढ होत नव्हती. मात्र, मागील दोन आठवडय़ापासून सूर्यनारायण चांगलाच कोपला आहे. विदर्भातील नागपूरसह अकोला, चंद्रपूर, अमरावती या शहरातील तापमान झपाट्याने वाढत आहे. कमाल तापमानच नाही तर किमान तापमानात देखील वाढ होत असून किमान तापमान ३० अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. अकोला आणि नागपूर या शहराने ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे, तर ४६.८ आणि ४६ अंश सेल्सिअससह चंद्रपूर व अमरावती, वर्धा ही शहरे त्या उंबरठ्यावर आहेत. याच सगळ्या कारणांच्या अनुषंगाने विदर्भात तीन दिवसांचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.