जिल्ह्यात अर्धवेळ टाळेबंदी असतानाही करोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. टाळेबंदीनेही करोना संसर्ग नियंत्रणात येत नसताना पुसद उपविभागात सात दिवस संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कालावधीत आरोग्य सेवेसह काही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद राहणार आहे. पुसद येथे करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता काही दिवस संपूर्ण टाळेबंदी करावी, अशी शिफारस पुसदच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह काही सहकारधुरिणींनी केली होती. त्याला प्रशासनानेही तत्परता दाखवत मान्यता दिली.

राज्यातील टाळेबंदी उठल्यानंतर मुंबईसह विविध राज्यात असलेले मुळचे पुसद व दिग्रस तालुक्यातील नागरिक गावाकडे परत आले. तेव्हापासून परिसरात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुसद शहरात बाधितांची संख्या ७० च्या वर पोहचली असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे शहरातील परिस्थिती चिघळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक, काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा, भाजपचे आमदार ॲड. नीलय नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन शहरात संपूर्ण टाळेबंदीची मागणी केली होती. तर येथील एका मोठ्या सहाकरी बँकचे अध्यक्ष शरद मैंद यांनीही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह शहरातील व्यापारी व प्रतिष्ठीत नागरिकांची ऑनलाईन बैठक घेऊन टाळेबंदीसंदर्भात विचार जाणून घेतले होते. या बैठकीत पुसद उपविभागात पुढील काही दिवस कडकडीत बंद पाळण्याचा सूर उमटला.

पुसद उपविभागातील दिग्रस तालुक्यातही करोनाबाधितांची संख्या शतकाच्या आसपास पोहचली आहे. दिग्रसमध्येही दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही तालुक्यांत करोना संसर्ग वाढत असल्यामुळे पुसदच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुसद आणि दिग्रस तालुक्यात पुढील काही दिवस संपूर्ण टाळेबंदी करण्यासंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्याची दखल घेत करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी पुसद उपविभागात २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून २८ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण टाळेबंदीसह संचारबंदी घोषित केली.

या काळात आरोग्य सेवा व औषधी दुकाने, शेती, शेती विषयक कामे, दूध विक्री संकलन, शासकीय कार्यालये, बँका आदी क्षेत्रांना शासनाच्या निर्देशांप्रमाणे शिथिलता देण्यात आली आहे. या दोन्ही तालुक्यातून बाहेर जाण्यासाठी किंवा तालुक्यात येण्यासाठी प्रवाशांना ई-पास अनिवार्य करण्यात आली आहे.