सातारा जिल्ह्यात लागू झालेल्या दहा दिवसांच्या टाळेबंदीला लोकांनीच चांगला प्रतिसाद दिला . आज सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लोकांनी कडकडीत बंद पाळला रस्त्यावर पूर्णता शुकशुकाट होता. मध्यरात्री बारा पासून साताऱ्यात दहा दिवसांच्या टाळेबंदीला सुरवात झाली.पहिले पाच दिवस कडक बंदी राहणार असून पुढील पाच दिवस अंशतः शिथिलता देण्यात येणार आहे.गुरुवारी दिवसभर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी नागरिकांनी गर्दी केली होती. मागील पंधरा वीस दिवसात अचानक जिल्ह्यात करोनाचे एक हजार बाधित रुग्ण ( एकूण २०४३) आढळून आले.
करोनामुक्त होणारांपेक्षा करोना बाधीत होणाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला.सध्या ९६४ रुग्ण जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत.जून महिन्यात सांचरबंदी नंतर नागरिकांना शिथिलता दिल्यानंतर नागरिकांच्या नियम बाह्य वर्तनामुळे अचानक रुग्ण संख्या वाढली आहे.त्यामुळे प्रशासनावर एकच दबाव आला त्यामुळे जिल्ह्यात दहा दिवस टाळेबंदी जाहीर करण्यात आली.
आज जिल्ह्यात सातारा शहरासह ,फलटण,खंडाळा,महाबळेश्वर,पाचगणी,खटाव,माण, कोरेगाव,कराड,पाटण या तालुक्यात पूर्णतः टाळेबंदी झाल्याचे दिसून आले. रुग्ण संख्या वाढल्याने वाई शहर पूर्ण प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आज फक्त औषधोपचार व रुग्ण सेवा वगळता सर्वत्र पूर्णतः कडकडीत बंद पाळण्यात आला.रस्त्यावर तुरळक वाहने होती.सर्वत्र पोलीस व स्थानिक नागरिक ,महसूल विभाग आदींची तपासणी नाकी व भरारी पथके तैनात होती.सर्व दुकाने,डी मार्ट,आपना बझार बंद आहेत.पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूकही टाळेबंदीमुळे प्रभावित झाल्याचे दिसून आले.
सातारा शहरातील राजपथ,राजवाडा, मोतीचौक,पोवई नाका आदी परिसरातील सर्व व्यवहार बंद होते.सर्व कार्यलये, बँका बंद होत्या. फलटण,लोणंद येथील बाजारपेठ,पंढरपूर रस्त्यावर वाहतूक जाणवत नव्हती.सर्व बांधकामही बंद आहेत.प्रशासनाने जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीला कोठेही मोठा विरोध होताना दिसला नाही. नागरिकांनी टाळेबंदी जिल्ह्यातील लोकांनी ओढवून घेतल्याचे अनेकांचे मत व्यक्त केले.व्यापाऱ्यांनी दुकाने वारंवार बंद असणे परवडणारे नसले तरी करोना वाढत्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी करून प्रशासनाला सहकार्य करायला हवे असे मत व्यक्त केले. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजपासून कडक टाळेबंदीची अमलबजावणी होणार आहे.विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. टाळेबंदीच्या काळात प्रशासनास सहकार्य करा व करोनाला थोपवा असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरात फिरून कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला