News Flash

राज्यात करोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर खाटांचे प्रमाण ढासळते!

मुंबईत अतिदक्षता विभागात ८ टक्के बेड शिल्लक

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात जवळपास रोज करोना रुग्णांची संख्या आठ ते नऊ हजाराने वाढत असून या वाढत्या करोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात खाटा मिळणे काही दिवसात कठीण होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हेंटिलेटर खाटा व ऑक्सिजन खाटांचा प्रश्नही गंभीर बनत चालला असून मुंबईत आजघडीला अतिदक्षता विभागात केवळ आठ टक्के खाटा शिल्लक आहेत, तर सात टक्के एवढेच व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध आहेत.

गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील करोनाने उग्र रुप धारण केले असून काल राज्यात ४९,४२७ करोना रुग्ण सापडले तर मुंबईत ९१०८ करोना रुग्ण आढळून आले. आज राज्यात ५७ हजाराहून अधिक रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. करोना रुग्णांच्या या वाढत्या संख्येनुसार रुग्णालयीन खाटा वाढवणे तसेच अतिदक्षता विभागातील खाटा व व्हेंटिलेटर खाटा वाढविण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे निर्माण झाले आहे. २१ मार्च रोजी आरोग्य विभागाकडे राज्यात एकूण १,५४,४६१ खाटा होत्या तर ४२,१९५ ऑक्सिजन खाटा, अतिदक्षता विभागात १४,१९४ आणि व्हेंटिलेटर असलेल्या ६७९८ खाटा उपलब्ध होत्या. करोना वाढणार हे लक्षात घेऊन ४ एप्रिलपर्यंत राज्यातील ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी एका पत्राद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना कळवले होते. त्यानुसार आजच्या दिवशी राज्यात करोना रुग्णांसाठी एकूण २,२०,४१९ खाटा उपलब्ध असून १,५१,१८७ रुग्ण उपचार घेत आहेत. याचाच अर्थ उपलब्ध खाटांपैकी ६८.५९ टक्के खाटा रुग्णांनी भरलेल्या आहेत. ऑक्सिजन खाटांची संख्याही वाढविण्यात आली असून ४२ हजारावरून ६२,३०४ एवढे ऑक्सिजन खाटा आज उपलब्ध आहेत. याठिकाणी १७,३१७ उपचार घेत असून ७२ टक्के खाटा अजूनही शिल्लक आहेत. अतिदक्षता विभागात २०,५१९ खाटा उपलब्ध असून आजच्या दिवशी १०,९५७ रुग्ण म्हणजे ५३.३९ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. याचाच अर्थ अतिदक्षता विभागातही जवळपास निम्म्या खाटा उपलब्ध आहेत, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात व्हेंटिलेटरच्या ९३४७ खाटा असून २६५६ रुग्ण उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरच्या जवळपास ७१ टक्के खाटा आजही रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. अर्थात ही झाली राज्याची आकडेवारी मात्र विभागवार विचार केल्यास तसेच ज्या प्रमाणात करोना रुग्ण वाढत आहे ते पाहाता परिस्थिती येत्या काही दिवसात गंभीर होईल, असा इशारा आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद सह अनेक जिल्ह्यात ज्या वेगाने रुग्ण वाढत त्यातून अनेक जिल्ह्यात आजच बेड मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मुंबईत महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी करोना रुग्णांसाठी युद्धपातळीवर खाटा वाढविण्याचे आव्हान स्वीकारले असून येत्या काही दिवसात २० ते २२ हजार खाटांची व्यवस्था झाली असेल असे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पालिकेकडे एकूण १२,९०६ खाटा उपलब्ध होत्या. आजच्या दिवशी पालिकेकडे १५,९७१ खाटा उपलब्ध असून यातील ३९८२ खाटा आजही रिकाम्या असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. मात्र अतिदक्षता विभागात दाखल होणार्या करोना रुग्णांच्या प्रमाणात वेगाने वाढ होत आहे. पालिकेकडे सध्या अतिदक्षता विभागात १८०५ खाटा असून त्यापैकी १३० खाटाच आता शिल्लक आहेत तर व्हेंटिलेटरच्या ११४३ खाटापैकी केवळ ७३ खाटा रिकाम्या आहेत. याशिवाय डायलिसिस व कॅन्सर असलेल्या करोना रुग्णांसाठी एकूण १३९ खाटा असून त्यापैकी अवघ्या ४५ खाटा शिल्लक आहेत.

मुंबईत काल नऊ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले असून हे प्रमाण असेच वाढत राहिले तर परिस्थिती कठीण होईल असे पालिका रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांचे म्हणणे आहे. राज्यात आढळणाऱ्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ८० टक्के रुग्ण हे लक्षणरहित असून त्यातील बहुतेकांना घरीच वा संस्थात्मक विलगीकरणाखाली आहेत. उर्वरित रुग्णांपैकी १७ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची तर तीन टक्के रुग्णांना अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरची आवश्यकता असते असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र अनेक जिल्ह्यात रुग्ण वेगाने वाढत असल्याने जिल्हावार विचार करता रुग्णांना खाटा मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच करोना वाढीचा वेग असाच राहिला तर रुग्णालयात खाटा मिळणे अवघड होऊन बसेल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 3:40 pm

Web Title: the number of intensive care units and ventilator beds for corona patients in the state is declining msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 .. यामुळे मुंबईतील आर्थिक घडामोडी नक्कीच थांबतील – संजय निरूपम
2 केंद्रीयमंत्री गडकरींकडून महाराष्ट्रातील महामार्गांसाठी भरघोस निधी जाहीर
3 “…ठाकरे सरकारने आतातरी काही ‘हाल’चाल करावी”
Just Now!
X