पुणे : राज्यावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असले, तरी त्याचा प्रभाव कमी होत असल्याने येत्या दोन दिवसांत राज्यातून पावसाळी वातावरण दूर होऊ शकणार आहे. मात्र, सध्या रात्री आणि दिवसा बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असल्याने किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊन उकाडाही जाणवू लागला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन बाष्पाचा पुरवठा झाल्याने प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या आठवडय़ात पावसाळी स्थिती निर्माण झाली. पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकणातही विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुण्यात शुक्रवारी जानेवारी महिन्यातील आजवरचा विक्रमी पाऊस झाला. शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मात्र, कोणत्याही भागात मोठय़ा पावसाची नोंद  झाली नाही. सध्या आग्नेय अरबी समुद्र ते वायव्य मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. या कालावधीत काही भागात हलक्या सरींची शक्यताही आहे. दोन दिवसांनंतर पावसाळी स्थिती दूर होऊन हवामान कोरडे होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे.

बंगालचा उपसागर आणि देशाच्या दक्षिणेकडे श्रीलंकेच्या बाजूने सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रात्रीचे तापमान २० अंशांपुढे

राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या रात्रीचे तापमान २० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे रात्रीचा हलका गारवाही नाहीसा होऊन उकाडा जाणवू लागला आहे. सध्या केवळ महाबळेश्वरच काही प्रमाणात थंड असून, तेथे राज्यातील नीचांकी १६.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमानही सरासरीपुढेच आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिकसह इतर ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा ८ ते १० अंशांनी अधिक आहे. कोकणात मुंबईसह इतरत्र किमान तापमान ३ ते ५ अंशांनी वाढले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ७ ते १० अंशांनी अधिक आहे.