अहिल्यानगर : राहुरी पोलिसांनी टेंभुर्णी (सोलापूर) येथील बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उघडकीस आणला आहे. टेंभुर्णी येथे तयार केलेल्या बनावट नोटा वितरणासाठी राहुरी शहरात आणण्यात आल्या होत्या. या संदर्भात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ५०० व २०० रुपये दराच्या सुमारे ४७ लाख रुपये किमतीच्या तयार केलेल्या बनावट नोटा व १८ लाख रुपये किमतीची कागदाचे, बंडल व यंत्रसामग्री असा एकूण ७० लाख ७३ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमात जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अंमलदार सुरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदीप ठाणगे, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, प्रमोद खांडगे, गणेश लिपने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय ३३, सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय ४२, कर्जत) व तात्या विश्वनाथ हजारे (वय ४०, पाटेगाव, कर्जत) या तिघांना राहुरीत अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपींनी टेंभुर्णी येथे शीतलनगर भागात समाधान गुरव यांच्या इमारतीत घर भाड्याने घेतले होते. तेथे छापा टाकून पोलिसांनी झेरॉक्स करण्याची यंत्रसामग्री व प्रिंटर, कटिंग करण्याचे यंत्र, नोटा बनवण्यासाठी लागणारा कागद, नोटा मोजण्याचे यंत्र, लॅमिनेशन यंत्र, कंट्रोलर युनिट अशी सर्व सुमारे ५ लाख रुपये किमतीची यंत्रसामग्री जप्त केली आहे. याशिवाय ५०० रुपये चलनाच्या बनावट नोटांची ७५ बंडल (किंमत ३७ लाख ५० हजार रुपये), २०० रुपये चलनाच्या बनावट नोटांची ४४ बंडल (किंमत ८ लाख ८० हजार रुपये), ५०० रुपयांच्या नोटा प्रिंट केलेले, परंतु कट न केलेल्या कागदाचे बंडल्स (किंमत १८ लाख रुपये) असा एकूण ७० लाख ७३ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जामिनावर सुटताच पुन्हा उद्योग सुरू
बनावट नोटांच्या प्रकरणात अटक केलेल्या तिन्ही आरोपींवर यापूर्वीही कुर्डूवाडी (सोलापूर) पोलीस ठाण्यात सन २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती. २२ महिने तुरुंगात राहिल्यानंतर तिघे जामिनावर सुटले व पुन्हा त्यांनी बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग सुरू केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिली.
राहुरीतील ‘कनेक्शन’चा शोध
टेंभुर्णी येथे बनावट नोटा तयार केल्यानंतर हे तिघे तरुण त्या वितरित करण्यासाठी मोटारसायकलवर काल, शनिवारी राहुरीत आले होते. पोलीस निरीक्षक ठेंगे यांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथक तयार करून नगर-मनमाड रस्त्यावरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावला व तिघांना ताब्यात घेतले. तिघे जण राहुरीमधील कोणाला या नोटा देणार होते, कोणामार्फत वितरित करणार होते, याची पोलीस चौकशी करत आहेत.