सोलापूर : सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर भाविकांच्या स्कार्पिओ मोटारीची आणि आयशर मालमोटारीची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात मोटार येथील एका दाम्पत्यासह चार भाविकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर नऊ भाविक जखमी झाले. यातील सर्व मृत आणि जखमी नांदेड व पुणे जिल्ह्यातील राहणारे आहेत. नवीन वर्षाचे औचित्य साधून देवदर्शनासाठी निघालेल्या या भाविकांचा दुर्दैवी जीवघेणा अपघात झाला.

गंगाधर राजांना कुणीपल्ली (वय ४६) आणि त्यांच्या पत्नी सागरबाई (४०, रा. केरूर, ता. बिलोली, जि. नांदेड) यांच्यासह हनमलु गंगाराम पाशावार (वय ३५) आणि त्यांची मुलगी वैष्णवी ऊर्फ ऐश्वर्या (वय १४, रा. कोंडळवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड) अशी या अपघातातील चौघा दुर्दैवी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये तीन बालकांसह पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. पिंटू बाबूलाल गुप्ता (वय २५), जयश्री गुप्ता (वय २८), कार्तिकी श्रेयस गुप्ता (वय २, रा. खेड, पुणे), आकाश हणमलु पाशावार (वय १०), सारिका हणंमलु पाशावर (४०), योगेश गंगाधर कुणीपल्ली (वय २५), छाया मोहन शिरळेवाड (वय ३५) आणि नामदेव बालाजी वाडीकर (वय २९, रा. नांदेड) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा…BJP : शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची ना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे भाविक स्कार्पिओ मोटारीतून नववर्षानिमित्त अक्कलकोट येथे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आटोपून पुढे श्री दत्तात्रयाच्या दर्शनासाठी प्रसन्न चित्ताने गाणगापूरकडे निघाले होते. परंतु अक्कलकोटपासून काही अंतरावर असलेल्या मैंदर्गी येथे शाब्दी फार्म हाऊससमोर त्यांच्या मोटारीची आणि समोरून येणाऱ्या आयशर मालमोटारीची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात या अपघाताची प्राथमिक नोंद झाली आहे.