scorecardresearch

“वरळीचा आमदार आमच्याच मताने निवडून आला, शहाणपणा शिकवू नये,” शिवसेनेच्या ‘हायजॅक वरळी’च्या आरोपावर आशिष शेलार आक्रमक

मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

“वरळीचा आमदार आमच्याच मताने निवडून आला, शहाणपणा शिकवू नये,” शिवसेनेच्या ‘हायजॅक वरळी’च्या आरोपावर आशिष शेलार आक्रमक
आशिष शेलार (संग्रहित फोटो)

मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जांभोरी मैदानावर भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. असे असताना भाजपातर्फे वरळी मतदारसंघाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. येणाऱ्या पालिका निवडणुकीत वरळीच नव्हे तर पूर्ण मुंबईवर भाजपाचे कमळ फुलणार आहे. शिवसेना पक्ष हिंदू सणांना विसरला आहे, असे शेलार म्हणाले. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींना बोलत होते.

हेही वाचा >> तृणमूल काँग्रेसच्या ‘कातडी सोलू’ला भाजपाचे ‘जोड्याने मारू’ने उत्तर; पश्चिम बंगालमधील राजकारण तापले

“शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडले आहे. शिवसेनेने मराठी माणसांचे सण कधीच मागे टाकले. शिवसेनेने दहीकाला, गणपती, नवरात्री, गोविंदा, श्रावण यातील सहभागीता कधीच सोडली. त्यांनी वरळीमधील जांभोरी मैदानासाठी अर्जदेखील केला नाही. मात्र जनता हे विसरणार नाही. जनता भारतीय जनता पार्टीसोबत आहे,” असे शेलार म्हणाले.

हेही वाचा >> “आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफाण भाषण

शेलार यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरदेखील प्रतिक्रिया दिली. आगामी निवडणुकीत भाजपाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “जो बुँद से गई वो हौद से नही आती. आता तुम्ही कितीही ओरडले तरी हिंदू सणांसोबत भाजपा आहे आणि शिवसेना या सणांना विसरली आहे, हे सर्वांना समजले आहे. वरळीच काय पूर्ण मुंबईत भाजपाचे कमळ फुलणार आहे. वरळीचा आमदारदेखील भाजपाच्याच मताने निवडून आला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये,” असेदेखील शेलार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या