Ravindra Chavan: मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही निवड केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला व त्यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तत्पूर्वी संघटनपर्व पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अद्यापही या पदावर राहणार की राजीनामा देणार? याबाबत येत्या काही दिवसांत स्पष्टता मिळू शकते. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडेही सध्या मुंबई भाजपचे अध्यक्षपद असून बावनकुळे आणि शेलार यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत पक्षातील जबाबदाऱ्या कायम राहण्याची शक्यता आहे.

प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर भाजपाचे प्रदेश महाअधिवेशन येत्या रविवारी (१२ जानेवारी) शिर्डी येथे होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत.

ravindra Chavan bjp mla
भाजपा आमदार यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे थोडे नाराज झालेल्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार, असे आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यापैकी एका नेत्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, असेही सांगण्यात येत होते.

या नेमणुकीनंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाचे आभार व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी आज माझ्यावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. आजच शिर्डी येथे भाजपा महाविजयी अधिवेशनाचीही सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक बैठकीत माझ्यावर सोपविण्यात आलेल्या नवीन जबाबदारीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.”