scorecardresearch

जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील समर्थकांकडून संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

गुलाबराव पाटील यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा केला निषेध; मुक्ताईनगरात समर्थक, कार्यकर्ते आक्रमक

Sanjay raut
संजय राऊत (संग्रहीत छायाचित्र)

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. याविरोधात गुलाबराव पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी धरणगाव येथे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध केला. मुक्ताईनगरमध्येही गुलाबराव पाटील यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत खासदार राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

शिवसेनेतील आमदारांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात बंड पुकारला आहे. गुलाबराव पाटील हे देखील शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना, गुलाबराव पाटलाला परत पानटपरी चालवावी लागेल, असे वक्तव्य केले आहे. याविरोधात जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत.

संजय राऊत हे मागच्या दारातून खासदार झाले –

गुलाबराव पाटील हे तळागाळातील नेते असून, सामान्य शिवसेना कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा नेता असा प्रवास त्यांचा आहे. चार वेळा ते जनतेतून निवडून आले असून, त्यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे. संजय राऊत हे मागच्या दारातून खासदार झाले असल्याची संतप्त भावना गुलाबराव पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. याच विरोधात खासदार राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत दहन देखील केले आहे.

जोरदार घोषणाबाजी करत खासदार राऊतांचा निषेध –

मुक्ताईनगर येथे खासदार राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून खासदार राऊत यांचा निषेध केला. मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणला होता.

…त्यामुळे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या –

“पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तळागाळातून महाराष्ट्राचे नेते झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी पानटपरीवर बसणारा अशी टीका कॅबिनेट मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्यावर केली. त्यामुळे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. गुलाबराव पाटील हे जनतेतून चार पंचवार्षिक निवडणुकांमधून निवडून आले आहेत. ते सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन मदतीचा हात देतात.” अशी प्रतिक्रिया धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Burning of a symbolic statue of sanjay raut by gulabrao patil supporters in jalgaon district msr