शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ( २६ मार्च ) मालेगावात सभा पार पडली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण, भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, यावर भाष्य केलं आहे.
राज ठाकरे यांच्याबरोबर भेट झाली. मात्र, या भेटीत निवडणुकीच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : “तुमचा नेता म्हणजे भारत नाही, एवढा क्षुद्र…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
“मशिदींवरील भोग्यांबाबत चर्चा केली. नियम आणि कायद्याने सर्व बाबी तपासल्या जातील. तसेच, मनसे कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही. सरकार आकसापोटी आणि सुडभावनेने कोणतीही कारवाई करणार नाही. हे सर्वसामान्याचं सरकार आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंनी सभा घेऊ नये, कामांवर लक्ष द्यावं, असं राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत म्हटलं होतं. याबद्दल विचारल असता एकनाथ शिंदे म्हणाले, “मी कामच करतोय. खेडच्या सभेत काही भूमिपूजन आणि निर्णय घ्यायचे होते, ते सांगितलं. भाषण देण्यासाठी कोणतेही सभा घेतली नाही. सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी गेलो होतो.”
हेही वाचा : “स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान…”, उद्धव ठाकरेंचा थेट राहुल गांधींना इशारा
आताचं सरकार शेतकऱ्यांचं मदत करत नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत म्हटलं. यावर विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट होते, तेव्हा सर्व नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली आहे. अर्थसंकल्पातही नमो शेतकरी योजना केली. पूर्वी काही घोषणा केल्या, पण त्याची अंमलबजावणी आणि पूर्तता केली नाही. अशी अनेक उदाहरण आहेत. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर योग्यवेळी बोलेन,” असेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.