सातारा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे – बंगळूर महामार्गवरील वाहतूकही पावसामुळे प्रभावित झाली आहे. सततच्या पावसामुळे २० व २१ ऑगस्ट रोजी पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जाहीर केले आहे. या पावसामुळे दुर्गम भागातील अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे संपर्क तुटला आहे.
महामार्गावर संथगतीने वाहतूक सुरू आहे. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाई येथे धोम धरणातून पंधरा हजार क्युसेक्स पाणी सोडल्याने वाई येथील गणपती मंदिरात पाणी गेले आहे. याचबरोबर महागणपती पुलावरून पाणी वाहत असल्याने छत्रपती शिवाजी पुलावरून वाहतूक होत आहे. मात्र, शहरात वाहतूक कोंडी होत आहे. सातारा शहरात रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकवतच नागरिकांना वाहने चालवावी लागत आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सध्याच्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यावेळी यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोयना धरणातून ८०५०० क्युसेक धोम १४५१०, धोम बलकवडी १०५६६, कण्हेर १५०००, तारळी ३५००, उरमोडी ६१५५, वीर ४२७३४ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणातून नदीत सोडलेला विसर्ग व धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने धरणाखालील मुक्त पाणलोट क्षेत्रातील वाई गणपती घाट छोटा पूल, चिंधवली, मर्ढे, खडकी पूल, सातारा तालुक्यातील हमदाबाज कीडगाव, करंजे म्हसवे पूल पाण्याखाली गेले आहेत. या पुलांचा वाहतुकीसाठी वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मौजे शिरगाव येथील विकास बापू कापडे यांचे घराची भिंत पडली. मात्र, या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.
शाळांना सुट्टी
सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अंदाज दिल्याने पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड या तालुक्यातील शाळा २०, २१ ऑगस्ट रोजी सर्व शाळा बंद राहतील, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली. तसेच कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यातील पर्जन्याची स्थिती पाहून तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा, शाळा सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षित रहावेत यासाठी पालकांनी दक्ष रहावे, असेही आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी केले आहे.