अकोले: मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड पर्वतरांगेत मुसळधार पाऊस सुरूच आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे आज, बुधवारी १४० मिमी तर रतनवाडी येथे १२९ मिमी पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अती पावसामुळे अनेक ठिकाणी भात रोपे पाण्याखाली गेल्यामुळे भात पिकाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही ठिकाणच्या जलविद्युत निर्मिती केंद्रांमधून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. मागील पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळापासून पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. मात्र पाऊस, हवेतील गारठा, काठोकाठ भरलेली भात खाचरे, ओढेनाले याच्या पाण्याने जलमय होणारा परिसर, दाट धुके यामुळे आदिवासी पट्ट्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सातत्याने सुरू असणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी भात रोपे पाण्याखाली गेली असून ती कुजण्याची शक्यता आहे. मे महिन्यातील पावसामुळे भात रोपांचा पेरा करण्यास या वर्षी उशीर झाला. त्यातच रोपांचा पेरा झाल्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे रोपांची वाढ योग्य प्रकारे झाली नाही. त्यातच अखंडपणे सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भातरोपे शेतात साठलेल्या पाण्याखाली गेली आहेत.
ओढ्यालगतच्या शेतात ही स्थिती दिसत असून या ठिकाणी भातरोपे सडू लागली आहेत.दुसरीकडे अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. एकंदरीत या अतिपावसाचा फटका खरीप हंगामाला बसण्याची शक्यता असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात आज सायंकाळी १३ हजार ५८७ दशलक्ष घनफूट साठा झाला होता. मुळा नदी दुथडी भरून वाहत असून सायंकाळी कोतुळजवळ मुळा नदीचा विसर्ग ७ हजार ३१० क्युसेक होता.
निळवंडे धरणातून सध्या वीजनिर्मिती केंद्रातून ८०० क्युसेक आणि विमोचकातून १०० क्युसेक असे ९०० क्युसेक पाणी नदीपात्रात पडत आहे. भंडारदरा धरणातूनही वीजनिर्मितीसाठी ८५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भंडारदरा धरणात सायंकाळी ७ हजार ३८ दलघफूट (६३.७६ टक्के ), निळवंडेत ४ हजार ४२९ दलघफूट ( ५३.१८ टक्के), आढळात ९६.२३ टक्के साठा आहे.