नांदेड : राज्याच्या १२ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांसाठी ‘शक्तिपीठ’ ठरत असलेल्या प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारत मालेगाव व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी बाया आणि मुला-बाळांसह रास्ता रोको आंदोलन करून मंगळवारी दोन तासांहून अधिक काळ महामार्ग रोखला. या आंदोलनाला शेतकरी नेत्यांसह आणि भाजपेतर पक्षांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला. ‘आता एकच जिद्द; शक्तिपीठ रद्द ’असा निर्धार या आंदोलनातून करण्यात आला.

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला मागील वर्षभरापासून ठिकठिकाणी विरोध झाला, तरी हा महामार्ग रेटून नेण्याचा चंग महायुती सरकारने बांधला आहे. या महामार्गाला असलेला विरोध सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी बाधित १२ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला होता. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील आंदोलन खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील मालेगाव येथे दमदारपणे करण्यात आले.

मंगळवारी दुपारी सुरू झालेल्या या आंदोलनात बाधित शेतकऱ्यांची कुटुंबेही रस्त्यावर उतरल्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी बनले. या महामार्गासाठी जमीन संपादित करताना सरकारने कायदेशीर तरतुदींचे पालन न करता जोरजबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तो उधळून लावण्याचा इशारा वरील आंदोलनातून देण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, कॉ. अर्जुन आडे, कॉ.प्रदीप नागापूरकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, शिवसेना ठाकरे गटाचे नागोराव इंगोले, शिंदे गटाचे प्रल्हाद इंगोले यांनीही आपला सहभाग नोंदविला. सरकारने हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनामध्ये माणिकराव इंगोले, हरिभाऊ कदम, महामार्ग विरोधी कृती समितीचे सतीश कुलकर्णी मालेगावकर, समन्वयक सुभाष मोरलवार, किशनराव कदम, मारोतराव भांगे, मधुकर राजेगोरे यांच्यासह विविध पक्षसंघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वरील आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचे आधी जाहीर केले होते. पण शेतकऱ्यांच्याच प्रश्नावरील एका बैठकीसाठी त्यांना दिल्लीला जावे लागल्यामुळे आंदोलनादरम्यान त्यांनी स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला होता. शक्तिपीठ महामार्गाविरुद्ध आपण लोकसभेत आवाज उठवणार आहोत, मी आणि माझा पक्ष बाधित शेतकऱ्यांसोबत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(शक्तिपीठ महामार्गाविरोधात नांदेडजवळ झालेल्या आंदोलनात महिला व लहान मुलेही सहभागी झाली होती.)