सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र श्री अमित सत्यवान जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना पदाची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा देवगड महाविद्यालयात थेट प्रक्षेपित करण्यात आला, ज्यामुळे देवगडवासीयांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले.
न्यायमूर्ती जामसंडेकर यांची नियुक्ती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने (कॉलेजियम) १९ ऑगस्ट २०२५ रोजी केली होती. या शिफारसीला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 224 (1) नुसार त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नेमणूक केली. ही माहिती भारत सरकारच्या गॅझेटमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास
न्यायमूर्ती जामसंडेकर यांचा कायदेविषयक प्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. देवगडसारख्या ग्रामीण भागातून जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण आणि शेठ म. ग. हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी देवगड महाविद्यालयातून ग्रामीण विकासामध्ये पदवी घेतली. त्यानंतर मुंबईच्या शासकीय महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली.
याचबरोबर, त्यांनी इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी (LLM) आणि लिसेस्टर विद्यापीठातून डॉक्टरेट (PhD) पदवी मिळवली. १९९८ पासून भारतात आणि २००१ पासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात वकिलीची सुरुवात केली. वकील म्हणून २८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यशस्वीपणे बाजू मांडली आहे. विशेषतः घटनात्मक, दिवाणी कायद्याशी संबंधित प्रकरणांमध्ये आणि बौद्धिक संपदा व व्यावसायिक खटल्यांमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे.
या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे महाअधिवक्ता, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, मुंबई उच्च न्यायालयाचे नामवंत वकील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही नियुक्ती देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे.